संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
भव्य प्रवेश दिंडी जल्लोषाने आर्य चाणक्यत नवागतांचे स्वागत
दखनी स्वराज्य, नरेश सिकची
पैठण : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई द्वारा संचलित आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर येथील नवागतांचे स्वागत आणि प्रवेश दिंडी सोहळा उत्साहात पार पडला.
ही आवडते मज मनापासूनी शाळा ! जसा लाविते लळा ही जसा माऊली बाळा !
या केशवकुमार यांच्या काव्य पंक्ती प्रमाणे आज शाळेच्या प्रथम दिनी आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर येथील नवागतांचे स्वागत करण्यात आले. शाळेचा परिसर स्वच्छ करून सडा, रांगोळी, फुग्यांची कमान, तोरण आदींची सजावट करत शाळा सुशोभित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ पद्मकुमार कासलीवाल, जुगलकिशोर लोहिया, मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी यांच्या शुभहस्ते सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, फुलांची पखरण अन् पुष्पवर्षाव करत चिमुकल्या नवागतांचे मान्यवर व शिक्षकांनी स्वागत केले. नवागतांचे औक्षण शाळेतील महिला शिक्षिका रेणुका गायकवाड, उज्ज्वला कुटे, शिखा शाह, जयश्री चाटुपळे, मिनाक्षी पिंपळे यांनी केले. बालचिमुकल्यांना गुलाब पुष्प, खाऊ आणि पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले. या वेळी नवीन प्रवेश घेतलेल्या बाल चिमुकल्यांच्या शुभहस्ते श्री, ॐ ही अक्षर रंगीत धुळपाटीवर काढण्यात आली. या ठिकाणी शैक्षणिक संदेश देणारे सेल्फी पॉईंटवर चिमुकल्यांनी मनसोक्त आनंद लुटला.
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत शिक्षण विषयी जनजागृतीचा संदेश देत पैठण शहरामध्ये भव्य अशी प्रवेश दिंडी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर येथील शिक्षकांच्या 11 दुचाकी, विद्यार्थ्यांच्या 11 शालेय बस, रिक्षा आदी सहभागी झाल्या होत्या.
या प्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश वानोळे, आप्पासाहेब गायकवाड, रामनाथ केकान आदी समवेत पैठण तालुक्यातील व शहरातील प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, पत्रकार, व्यापारी, वकील, सामाजिक कार्यकर्ते, पालक वर्ग आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनोज शिंगारे व आभार प्रदर्शन प्रियंका निकाळजे यांनी केले.