संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
नऊ जनावरांची पोलिसांनी केली सुटका
जैतखेडा वार्ताहर : कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथे गुरुवारी पहाटे ५:३० वाजता करण्यात आलेल्या दोन वेगवेगळ्या कारवायात पोलिसांनी नऊ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करून एक वाहनासह जनावरे असा एकूण ६ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताड पिंपळगाव- देवगाव रंगारी रस्त्यावरून पिकअप वाहनातून (एमएमच २०- डिई २८७५) तीन गोवंश जातीच्या जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाल्यानंतर गुरुवारी पहाटे पोलिस अधीक्षक यांचे विशेष पथक व स्थानिक पोलिसांनी देवगाव रंगारी येथे सापळा रचला. येथे पिकअप वाहन येताच त्याला थांबविले असता त्यात गोवंश जातीचे तीन, तर जवळील एका खळ्यावर ६ अशी ९ जनावरे आढळून आली. यावेळी पोलिसांनी वाहन चालक सनी दिवेकर, जनावरांचा मालक हुसैन कुरैशी दोघे (रा. देवगाव रंगारी) व एक अनोळखी व्यक्तीविरोधात देवगाव रंगारी ठाण्यात गुन्हा दाखल करून जनावरांची पशुवैद्यकीय दवाखान्यात तपासणी केली. त्यानंतर त्यांची रवानगी जैतखेडा येथील सद्गुरू सेवा धाम गोशाळेत दत्ता महाराज कदम यांच्या कडे करण्यात आली आहे.