संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
कवी ललित अधाने यांना मनोरमा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर :- येथील आघाडीचे कवी प्रा.डॉ.ललित अधाने यांना साहित्य क्षेत्रातील अत्यंत मानाचा "मनोरमा साहित्य मंडळी सोलापूर व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम (मनोरमा) सोलापूर" यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा "मनोरमा मल्टिस्टेट पुरस्कृत मनोरमा साहित्य पुरस्कार 2024" देण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आलेला आहे. सदर माहिती मनोरमा सोशल फाउंडेशन संचलित मनोरमा साहित्य मंडळी सोलापूरचे अध्यक्ष श्रीकांत मोरे व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा सोलापूरचे सचिव सुनील पाटील यांनी पत्राद्वारे कळविली आहे.
डॉ. ललित अधाने हे विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर येथे मराठीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. नव्वदोत्तर पिढीतील एक महत्त्वाचे कवी आणि समीक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा 'कुणबी बाप' (कवितासंग्रह), 'नाट्यानुबंध' (समीक्षा ग्रंथ), 'वाङ्मयीन प्रवृत्ती तत्त्वशोध' (संपादन) प्रकाशित असून त्यांच्या नुकत्याच प्रकाशित झालेला 'माही गोधडी छप्पन भोकी' हा कवितासंग्रह सर्वत्र गाजत आहे. या कवितासंग्रहासाठी आजपर्यंत महाराष्ट्रातील 'सत्यशोधक दीनमित्रकार मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार', 'कै. सौ. इंदुमती देशमुख कुंटूरकर स्मृती वाङ्मय पुरस्कार', 'शब्दकळा साहित्य संघ, मंगळवेढाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार', 'रंगकर्मी साहित्य, कला, क्रीडा प्रतिष्ठान उदगीर, जि. लातूरचा राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार', 'लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार' इत्यादी नामांकित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
गेल्या 26 वर्षांपासून मनोरमा राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण केले जाते. यंदाचे हे 27 वे वर्ष असून राज्यातील अथवा राज्याबाहेरील साहित्यिकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा हा पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक 16 जून 2024 रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणार आहे. या समारंभात कवी ललित अधाने यांना सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते तसेच ज्येष्ठ सिने कलावंत अशोक समेळ, सिने कलावंत व लेखिका मधुरा वेलणकर, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असून, या समारंभाचे अध्यक्षस्थान मनोरामा साहित्य मंडळी व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा पश्चिम (मनोरमा) चे अध्यक्ष श्रीकांत मोरे हे भुषवणार आहेत. दहा हजार रुपये रोख रक्कम, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कैलास पब्लिकेशनचे कैलास अतकरे, कवी डॉ. पी. विठ्ठल, डॉ. कैलास अंभुरे, डॉ. बाळासाहेब लबडे, लेखाधिकारी शरद भिंगारे, डॉ. ओमप्रकाश जाधव, डॉ. अनिरुद्ध मोरे, डॉ. शशिकांत पाटील, डॉ. नवनाथ गोरे, डॉ. जिजा शिंदे, निरा देवकाते, रमेश रावळे, आशा मिसाळ, अर्चना माने, कीर्ती विधाते, बासू भंडारी, अनिल अधाने, ज्ञानेश्वरमाऊली अधाने, प्रशांत अधाने यांनी कवी डॉ. ललित अधाने यांचे अभिनंदन केले.