संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
अ.भा.बालसाहित्य
शाखा शिरुर (का.)
अध्यक्षपदी डॉ.भास्कर बडे
दखनी स्वराज्य, शिरुर कासार -
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे, यांच्या कार्यकारीणीची बैठक दि.21 जुलै रोजी पुणे येथे होऊन त्यात शिरूर कासार( जिल्हा बीड) या तालुका शाखेस मंजुरी देण्यात आली. शिरूर कासार शाखेच्या अध्यक्षपदी ग्रामीण कथाकार तथा साहित्यिक डॉ.भास्कर बडे यांची निवड झाली आहे. निवड झाल्याचे पत्र संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरु यांनी दिले आहे.
सदर शाखा ही अकरा सदस्यांची असून त्यात बालकवयित्री कु.अनघा कुलकर्णी हीची सचिवपदी निवड करण्यात आली आहे. संचालक म्हणून श्री अनंत कराड, सिध्दार्थ सोनवणे, दशरथ साबळे, आराध्या नागरगोजे, अमित महारनोर, राज कांबळे, श्याम शेकडे, राजेंद्र दहिफळे, पांडुरंग शिंदे यांची निवड झाली आहे. या शाखेचा कार्यकाळ पाच वर्षाचा असणार आहे.
या शाखेच्यावतीने बालकांसाठी साहित्याचे कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. त्यात कविता, कथा, कादंबरी, प्रवास, नाटक, ललितलेखन कसे करावे, काव्यवाचन, कथाकथन, गोष्टी सांगणे यांचे मार्गदर्शन शिबीर घेतले जातील. तसेच बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असून, निवडक बालसाहित्यिकांना अखिल भारतीय बालसाहित्य संमेलनासाठी प्रोत्साहन म्हणून पाठवले जाईल. तर काही बाललेखकांची पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत.
बीड जिल्ह्यात शिरुर-कासार येथील ही शाखा एकमेव नोंदणीकृत आहे. दि.21 जुलै रोजी पुणे येथे अखिल भारतीय बालसाहित्य संस्थेचे अध्यक्ष मा.माधव राजगुरु यांनी शाखाध्यक्ष डॉ.भास्कर बडे यांच्याकडे शाखा मेळाव्यात प्रमाणपत्र दिले आहे. याप्रसंगी कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, कोषाध्यक्ष संजय ऐलवाड हजर होते. शाखा नोंदणी करुन दिल्याबद्दल शाखाध्यक्ष डॉ.भास्कर बडे यांनी अ.भा.बालसाहित्य संस्थेचे आभार मानले आहेत.