संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
छत्रपती संभाजीनगर, तत्त्वज्ञान ही आपल्याकडे प्रचंड क्लिष्ट करून टाकलेली गोष्ट आहे. मात्र तत्त्वज्ञान हे स्वतंत्र आणि उकल करून सांगणारे असते. फ्रान्समध्ये बारावीपर्यंत तत्वज्ञान हा विषय विद्यार्थ्यांना शिकणे आवश्यक आहे, तर आपल्याकडे तत्वज्ञानाचे विभाग बंद पडत आहेत. प्रत्येक जणच तत्त्वज्ञ असतो. आपल्यापुरते थोडेफार तो सगळे जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याकडे मात्र तत्त्वज्ञानाला फार अवघड किंवा क्लिष्ट करून टाकले आहे' असे मत दिल्ली येथील जेएनयूचे प्राध्यापक तथा तत्त्वचिंतक प्रा. शरद बाविस्कर यांनी व्यक्त केले. ते महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गांधी भवन येथे 'पाश्चात्त्य तत्त्वज्ञान समजून घेतांना' या विषयावर आयोजित संवाद या कार्यक्रमात बोलत होते. प्रगतिशील लेखक संघ, लोकसंवाद फाउंडेशन आणि महात्मा गांधी स्मारक निधी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले ज्येष्ठ विचारवंत डॉ. उमेश बगाडे यांनी भूमिका मांडली. प्रगतिशील लेखक संघाचे सचिव डॉ. समाधान इंगळे यांनी सूत्रसंचालन केले तर लोकसंवाद फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी आभार मानले. यावेळी मंचावर प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर शेंडगे, महाराष्ट्र गांधी स्मारक निधी केंद्राचे कार्याध्यक्ष डॉ. मच्छिंद्र गोर्डे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी शहरातील साहित्यिक आणि वैचारिक चळवळीतील मंडळी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होती. यामध्ये माजी न्यायाधीश प्रकाश परांजपे, सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे ॲड. के. ई. हरिदास, प्रा. एच.एम. देसरडा, बाबा भांड, विजय राऊत, प्राचार्य डॉ. राम चव्हाण, माजी प्राचार्य बागुल, साथी सुभाष लोमटे, डॉ. उमाकांत राठोड, डॉ. अर्जुन मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने
तत्त्वज्ञानाचे महत्त्व जाणणारे अभ्यासकही उपस्थित होते. ज्यामध्ये युवकांची उपस्थिती लक्षणीय होती.