संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पैठण येथील विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये "शिक्षक प्रशिक्षण शिबिर २०२५" आयोजित केलेले असून मानसी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री देवेश इनामदार यांनी "आर्थिक साक्षरता आणि आर्थनियोजन" या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा.संतोष तांबे हे होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणांत बोलताना श्री इनामदार म्हणाले की, " आपल्याकडील पैसे गुंतवणूक स्वरूपात मार्केटमध्ये लावताना सुरक्षितता याला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. जास्तीचा नफा मिळवण्याच्या नादात आर्थिक फसवणूक होणार नाही ना याची काळजी प्रत्येकाने गुंतवणूक करताना घेतली पाहिजे", असा सल्ला श्री इनामदार यांनी दिला. अधिक नफा ही लालसा नसावी, अन्यथा रोज कुठलीतरी व्यक्ती फसवली गेल्याची बातमी आपल्या कानी पडते आहे. अनेकांना कर्ज घेणे आवडते परंतु ते वेळेत परतफेड करणे याला फार महत्व आहे. आज डिजिटल युगात आपले पॅन कार्ड चेक केले की आपला संपूर्ण आर्थिक व्यवहार दिसतो. यापूर्वी घेतलेले कर्ज, जामीनदार, क्रेडिट कार्ड, बँक ट्रांजीक्सन या सगळ्या गोष्टीवरून आपली पत ठरत असते. आपला सी.बिल मधील क्रेडिट स्कोअर कमी आल्यास आपल्याला बँक दारात उभी करत नाही. अशावेळी पतसंस्था आपली पत सुधारायला मदत करत असतात. मात्र आर्थिक शिस्त फारच महत्त्वाची असते. पैसा घरात ठेवण्यापेक्षा चलनात आणला तरच अर्थवृद्धी होते. शिवाय गुंतवणूक करताना जंगम मालमत्ता न घेता, स्थावर मालमत्तेत गुंतवणूक करणे शहाणपणाचे असल्याचे अनेक उदाहरणे देत त्यांनी अर्थ साक्षरतेचे फायदे समजावून सांगितले. आपल्या विनोदी शैलीत क्लिष्ट असलेला अर्थ व्यवहार त्यांनी श्रोत्यांना सुलभ करून सांगितला. राष्ट्रीयकृत बँक, नागरी बँक, पतसंस्था, मल्टिस्टेट यातील फरक आणि यावर कोणत्या विभागाचे नियंत्रण असते याचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.लता पवार जगताप यांनी केले तर पाहुण्याचा परिचय प्राचार्य आर.बी. रामावत यांनी करून दिला. शिबिर सत्राचे सूत्रसंचालन सौ.सारिका धोकाटे यांनी केले. आभार प्रदर्शन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंगल कोळगे यांनी मानले. पाहुण्याचा सत्कार सौ.सोनाली गोरे यांनी केला. शिबिरास आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूलचे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक - शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दिनांक २६/०५/२०२५ पासून ते ०५/०६/२०२५ असे दहा दिवस सदर शिक्षक प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे.