संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
आनंदपूर शाळेत प्लॅस्टिक ऐवजी कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा संदेश देत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
दखनी स्वराज्य / नरेश सिकची, पैठण
"मला बाजाराला जायचं बाई" या मनोरंजनात्मक भारुडरुपी एकांकिकेच्या माध्यमातून प्लॅस्टिक ऐवजी कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन करत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा आनंदपुर (ता.पैठण) येथे स्वातंत्र्य दिना निमित्त तिरंगा सायकल रॅली, प्रभातफेरी, हर घर तिरंगा उपक्रम, ध्वजारोहन, देशभक्तीपर गीते, समुहगान, बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा, भाषणे तसेच भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वाटपाने संपन्न झाला. इयत्ता सातवी च्या विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिक मुक्तीवरील "मला बाजाराला जायचं बाई" या नाटिकेला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या एकांकिकेतून प्लॅस्टिक पिशव्यांचा पर्यावरणावर किती घातक परिणाम होतो हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिले. प्लॅस्टिक ऐवजी कागदी व कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन या मनोरंजनात्मक भारुडरुपी एकांकिकेतून केले. शाळेचे ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तुकाराम तांबे यांचे हस्ते झाले. यावेळी सरपंच, उपसरपंच, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य,तंटामुक्त समिती, पोलिस पाटील,ग्रामसेवक, अंगणवाडी कर्मचारी, शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय विद्यार्थीनी कार्तिकी नरके व तनुजा तांबे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अरुण गोर्डे, पदवीधर शिक्षक उदय सुलाखे, सुनील जोशी, भागवत पांगरे, भक्तराज फुंदे, शशिकांत ठोंबरे, वर्षा गर्जे यांनी परिश्रम केले. खाऊवाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.