संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
औट्रम घाटातील बोगद्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषण
नागरिकांनी उपस्थित राहण्याचे कन्नड तालुका संघर्ष समितीचे आवाहन
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर, दि. ११ (प्रतिनिधी) - मराठवाडा खान्देशला जोडणारा सोलापूर-धुळे (५२) राष्ट्रीय महामार्गात औट्रम घाटात बोगदा (टनेल) व्हावा, अशी कित्येक वर्षांची नागरिकांची आग्रही मागणी आहे. यासाठी कन्नड तालुका संघर्ष समितीने जनआंदोलन उभे केले होते. मात्र, अद्यापही केंद्र आणि राज्य सरकारने या विषयांकडे दुर्लक्ष केले आहे. यासाठी उद्या सोमवार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लक्ष वेधण्यासाठी साखळी उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणाला सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कन्नड तालुका संघर्ष समितीने केले आहे.
गौताळा अभयारण्यातील व्याघ्र प्रकल्प मंजूर करणे, नियोजित गुजरदरी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम घाटातील बोगद्याचे काम तात्काळ सुरू करावे, आदी विविद प्रलंबित मागण्यांसाठी शिवसेनेचे तालुकासंघटक, माजी जि.प अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब शिंदे यांनी संघर्ष समितीची स्थापन करून लाखो लोकांच्या स्वाक्षरी मोहीम घेतली. यासाठी त्यांनी नवी दिल्ली आणि मुंबई याठिकाणी जाऊन केंद्र आणि राज्य सरकारचे उंबरठे झिजवले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्ग सुरूळीत झाल्यास पर्यटन वाढेल, शेतकर्यांना आपला माल लवकर विकता येईल, रोडवरील व्यावसायिकांना उत्पन्न मिळेल. तर गौताळा येथे वाघ्र प्रकल्प झाल्यास शेतकर्यांवरील प्राण्यांचे हल्ले थांबतील. तसेच पितळखोरा लेणी, किल्ले अंतूर, गणित तज्ञ भास्कराचार्य यांच्या तपोभूमीचा विभाग व्हावा आदी मागण्या केल्या आहेत. तर गुजरदरी धरणास मंजूरी दिल्यास कन्नड, वैजापूर, नांदगाव तालुक्यातील १०० गावांचा सिंचनाचा प्रश्न सुटणार आहेत.
शासनाने मागण्या तातडीने मान्य कराव्या यासाठी कन्नड तालुका संघर्ष समितीने उपोषण पुकारले आहे. यावेळी डॉ. अण्णासाहेब शिंदे, सरपंच अशोक दाबके, डॉ. सदाशिव पाटील, प्रकाश आबा आहेर, गोकूळ गोरे, राजू राठोड आदींसह कन्नड, वैजापूर, चाळीसगाव, नांदगाव तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पेट्रोल पंप चालक, हॉटेल व्यावसायिक, गॅरेज चालक, शेतकरी उपस्थित राहणार आहेत.