संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
अय्युब पठाण यांना "महाराष्ट्र भूषण जीवन गौरव" पुरस्कार
दाखनी स्वराज्य, पैठण :- बालभारतीच्या पाठयपुस्तकातील प्रसिद्ध कवी तथा "पाणपोईकार" अय्युब पठाण लोहगांवकर यांना नांदेड येथील "महात्मा कबीर समता परिषद" या संस्थेच्यावतीने दिला जाणारा २०२४ चा पुरस्कार जाहीर झाला आहे. पठाण यांच्या जीवनातील अत्यंत सन्मानाचा "महाराष्ट्र भूषण जीवन गौरव" पुरस्कार नुकताच त्यांना जाहीर झाला आहे, असे संस्थापक अध्यक्ष डॉ.मुकुंदराज पाटील यांनी अय्युब पठाण यांना कळविले आहे. "बँन्डमास्टर ते शाळामास्तर व्हाया मराठी साहित्यिक" झालेले अय्युब पठाण यांनी मराठी साहित्य क्षेत्रात ३२ वर्षापासून साहित्य लेखनात भरीव योगदान दिलेले असून आजपर्यंत त्यांची बारा पुस्तके प्रकाशित झालेली आहे. तसेच २२ वर्षे लग्न-कार्यात बँन्डबाजा वाजवून समाजाचे मनोरंजन केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात ३३ वर्ष सहशिक्षक म्हणून पवित्र अध्यापनाचे कार्य केले. तसेच "मुले रंगली काव्यात" या एकपात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे विविध शाळा-महाविद्यालयात १०५ प्रयोग सादर करून मुला-मुलींचे प्रबोधन केले आहे. अय्युब पठाण लोहगांवकर यांच्या महान अशा कार्याची दखल घेऊन नांदेड येथील, महात्मा कबीर समता परिषदने श्री. पठाण यांना "महाराष्ट्र भूषण जीवन गौरव" पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्कार समितीत महाराष्ट्रातले विविध क्षेत्रातील तज्ञांनी श्री. पठाण यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. या पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, स्मृतिचिन्ह, मानाचा फेटा, सन्मानपत्र,आणि शाल-श्रीफळ व रोख रक्कम असे असून लवकरच मान्यवरांच्या हस्ते अय्युब पठाण यांना, "महाराष्ट्र भूषण जीवन गौरव" पुस्काराने गौरविण्यात येणार आहे.