संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
बालकांच्या जडणघडणीमध्ये मातापालकांची भूमिका महत्वाची -- केंद्रप्रमुख उत्तमराव खरात
दखनी स्वराज्य / नरेश सिकची
आनंदपूर - जि.प.उच्च प्राथमिक शाळा, आनंदपूर, ता.पैठण आयोजित 'शाळा पूर्वतयारी मेळावा क्र.२' अंतर्गत 'शाळेतले पहिले पाऊल' हा इयत्ता पहिली प्रवेशपात्र विद्यार्थ्यांसाठीच्या कार्यक्रम प्रसंगी आपेगाव चे केंद्रप्रमुख उत्तमराव खरात बोलत होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रवेशपात्र नवागत बालकांचे औक्षण करुन त्यांच्या पाऊलांचे ओल्या कुंकवाचे ठसे घेण्यात आले. सर्व नवागतांचे गुलाबपुष्प,आणि मिठाई देऊन स्वागत करण्यात आले. वेगवेगळ्या सात प्रकारच्या स्टॉलद्वारे विद्यार्थ्यांचे ज्ञान हसतखेळत व मनोरंजनातून अवगत करण्यात आले. यामध्ये शारीरिक, बौद्धीक, सामाजिक, भावनिक विकासाबरोबरच गणितीय संबोध, नातेसंबंध, व्यवहार ज्ञान याची चित्रे व साहित्याद्वारे माहिती देण्यात आली.
प्रवेशपात्र विद्यार्थ्यांचे विकास पत्र व प्रवेशपत्र भरुन घेवून शाळेतले पहिले पाऊल व विद्याप्रवेश पुस्तक त्यांना भेट देण्यात आले.
बालकांच्या जडणघडणीमध्ये माता पालकांचा सहभाग अनन्यसाधारण असतो. प्रत्येक बालकांचे प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून व मराठी शाळेतूनच व्हायला पाहिजे असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष आपेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख उत्तमराव खरात यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष संदिपान निवारे, मुख्याध्यापक अरुण गोर्डे, पदवीधर शिक्षक उदय सुलाखे, सुनील जोशी,भागवत पांगरे, भक्तराज फुंदे, शशिकांत ठोंबरे, वर्षा गर्जे, अंगणवाडी सेविका रंजनाताई वाघमारे, श्रीमती काळे, साईनाथ तांबे, विराज खराद, योगिता निर्मळ तसेच अनेक मातापालक, ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा. सुनील जोशी यांनी तर आभार प्रा. शशिकांत ठोंबरे यांनी मानले.
"या लाडक्या मुलांनो तुम्हीच शिल्पकार" या साने गुरुजींच्या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.