Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

बालकुमार साहित्य संस्थेचा शाखा मेळावा उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 27 September 2024 12:04 PM

बालकुमार साहित्य संस्थेचा शाखा मेळावा उत्साहात संपन्न

- सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन

पुणे : अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था येत्या 1 ऑगस्टपासून सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यामुळे वर्षभरात अखिल भारतीय व विभागीय संमेलनासह राज्य आणि परराज्यात विविध 50 कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचा निश्चय रविवारी संस्थेच्या शाखा मेळाव्यात करण्यात आला.

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा शाखा मेळावा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोहिनूर सभागृहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, कोषाध्यक्ष संजय ऐलवाड, विश्वस्त राजेंद्र कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य सुनिल महाजन, निर्मला सारडा, अशोक सातपुते, सचिन बेंडभर, श्रीकांत चौगुले, जेष्ठ बालसाहित्यिक सूर्यकांत सराफ, मध्य प्रदेश शासनाचे मराठी साहित्य अकॅडमीचे माजी संचालक उदय परांजपे आदी उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना सूर्यकांत सराफ म्हणाले, मुले इंग्रजी शाळेत शिकत असली तरीही पालकांनी मराठीतील चांगल्या कविता, कथा मुलांना वाचून दाखवाव्यात तसेच लेखकांनी बदलत्या काळानुरूपाचे संदर्भ घेऊन लिहावे. बाल साहित्यिकांनी चांगल्या कथा, कवितांचे मुलांकडून अभिवाचन करून घ्यावे. मुलांना व्हिडीओ ऐकण्यात अधिक आनंद मिळतो.

सुवर्ण महोत्सवी वर्षात विविध प्रकारच्या लेखन स्पर्धा व कार्यशाळा घेणे, जिल्हा स्तरीय आंतर शालेय नाट्य स्पर्धा घेणे, ग्रामीण भागातील शाळेत पुस्तक पेढी उपक्रम राबविणे, मुलांच्या उत्कृष्ट लेखक स्पर्धेतून येणाऱ्या साहित्य कृतीचे प्रकाशन करण्याची जबाबदारी मुख्य संस्था घेणार असून ती पुस्तके अल्प किंमतीत उपलब्ध करून देणार आहे. आदी विषयावर या मेळाव्यात चर्चा झाली.

संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मुलांमध्ये लेखन, वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू विध्यार्थी वाचक संवाद यात्रा काढणार आहेत. या यात्रेत शाळांना भेटी देऊन मुलांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच या संवाद यात्रेत शाखा व संस्थेचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. राज्यात ज्या शाळेत कार्यक्रम घेतला जाईल. त्या शाळेतील मुलांना बाल साहित्याची पुस्तके मोफत दिली जाणार आहेत. ही यात्रा 23 ऑगस्ट 2024 ला सरू होईल आणि 24 डिसेंबर 2025 रोजी साने गुरुजी यांच्या 125 व्या जयंतीदिनी सांगता होईल. संवाद यात्रेत जे उत्तम वाचन, लेखन करणारे विध्यार्थी भेटतील त्यांना अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनात व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू यांनी सांगितले.

उदगीर, नांदेड शहर, नांदेड ग्रामीण, जालना, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, शिरूर कासार (बीड), शिरूर (पुणे), चाळकवाडी (जुन्नर), कोल्हापूर, राजापूर, संगमनेर, इंदोर (मध्य प्रदेश) बेळगाव (कर्नाटक) हैदराबाद (तेलंगना) येथील शाखेचे प्रतिनिधी उपस्थित होते. सूर्यकांत सराफ, अनिल कुलकर्णी, सुनिल महाजन, उदय परांजपे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. रामदास केदार, माधव चुकेवाड, श्रीकांत पाटील, विनोद सिनकर, डॉ. भास्कर बडे, विरभद्र मिरेवाड, सुहास सदावर्ते, वैजनाथ अनमुलवाड, सचिन बेंडभर, विश्वनाथ ससे आदी प्रतिनिधींनी विविध सूचना मांडल्या. संजय ऐलवाड यांनी स्वागत केले. अनिल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सचिन बेंडभर यांनी आभार मानले.


शाखेला उत्कृष्ट कार्य पुरस्कार

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे दरवर्षी बालसाहित्यातील विविध वाड:मय प्रकारात 16 वार्षिक राज्य स्तरीय पुरस्कार तसेच जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. यंदापासून राज्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शाखेला उत्कृष्ट कार्य पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती माधव राजगुरू यांनी दिली.