संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
बारसवाडा: बारसवाडा येथे भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरीने झाली. यात चित्ररथाच्या धर्तीवर शाळेतील प्रत्येक वर्गासाठी एक उपक्रम देऊन विविध उपक्रमांची अंमलबजावणी व जनजागृती करण्यात आली. हर घर संविधान अंतर्गत भारताचे संविधान पालखीमध्ये ठेवून मिरवणूक काढण्यात आली. बेटी बचाओ, बेटी पढाओ या कार्यक्रमाच्या दशकपूर्तीच्या अनुषंगाने भारत माता, सावित्रीमाई फुले, राजमाता जिजाऊ, झाशीची राणी अशा विविध महिला राष्ट्रनेत्यांच्या वेशभूषा करून विद्यार्थीनी सहभागी झाल्या होत्या. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत महात्मा गांधी यांचा पेहराव करून कुष्ठरोगाबाबत माहिती व संदेश देणारे फलक प्रभात फेरीमध्ये शालेय विद्यार्थ्यां मार्फत प्रदर्शित करण्यात आले. कुष्ठरोगाबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. तंबाखूमुक्त शाळा अंतर्गत सलाम मुंबई फाउंडेशन यांच्याकडून प्राप्त विविध चार्टच्या माध्यमातून धूम्रपान विरोधी जनजागृती करण्यात आली. मतदानाविषयी घोषणा व चित्रांच्या माध्यमातून जनजागृती केली. शाळेतील लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते तर प्रभात फेरीचे स्वागत घरासमोर सडा, रांगोळ्या काढून ग्रामस्थांनी केले. प्रभात फेरीनंतर ग्रामपंचायत कार्यालय बारसवाडा येथे सरपंच रामेश्वर खंडागळे तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारसवाडा येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राधाकिसन सावंत यांनी ध्वजारोहण केले. किसनराव गायकवाड व राजेंद्र सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी भाषणे केली त्याचबरोबर देशभक्तीपर गीते सादर केली. क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमातील विजयी स्पर्धकांना बक्षीस वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. शालेय परिसर सुशोभीकरणासाठी ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने वृक्ष भेट दिले. नवतरुणांनी विद्यार्थ्यांना वह्या व शैक्षणिक साहित्य वाटप केले. एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा, नॅशनल असोसिएशन ऑफ द ब्लाइंड युनिट कडून प्राप्त प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच गजानन सावंत, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष आबासाहेब शिंदे, चेअरमन अर्जुन गायकवाड, प्रवीणराव वाकडे, पोलीस पाटील जगन्नाथ माळकरी, पांडुरंग गटकळ, पंढरीनाथ माळकरी, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष मिठे, भानुदास भोळे, ग्रामपंचायत सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, यांच्यासह विद्यार्थी पालक ग्रामस्थ यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक कैलास जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार उपक्रमशील शिक्षक श्रीधर कुलकर्णी, संतोष सावंत, अर्जुन खोंडे, सुरेखा जाधव, लहू गोल्हार, आकाश गडवे यांनी परिश्रम घेतले.