संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
देवगिरी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सातारा डोंगरावर वृक्षारोपण
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर : येथील देवगिरी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत "एक पेड माँ के नाम" या उपक्रमांतर्गत पाचशे वृक्षांचे वृक्षारोपण शहरा नजीकच्या सातारा डोंगरावरील खंडोबा मंदिरामागे करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर अशोक तेजनकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य प्रोफेसर अशोक तेजनकर म्हणाले की, ‘निसर्गामध्ये होणारे बदल, यामुळे पडणारा अनियमित पाऊस यामुळे तापमानामध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत आहे. अलीकडे सरासरीपेपेक्षा पाऊस कमी पडत आहे; त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने पावसाळ्यात वृक्षारोपण करून त्याचे संगोपन केल्यास भविष्यामध्ये पृथ्वीचा समतोल राखला जाऊ शकतो. आता यापुढे वृक्षारोपण केले तरच आपण तापमान वाढ थांबवू शकतो. तसेच अशा रचनात्मक सामाजिक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यानी सक्रियपणे सहभागी होऊन देशाच्या शाश्वत विकासात आपले योगदान दिले पाहिजे. राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत आयोजित हा उपक्रम महत्वपूर्ण उपक्रम असून प्रत्येकाने आपल्याला जमेल तसे वृक्षारोपण करून आपल्या परिसरातील लोकांनाही याबद्दल जागृत करून सामाजिक जबाबदारी पार पाडावी व इतरांना प्रोत्साहित करावे,असे आवाहन देखील त्यांनी केले. या उपक्रमांत रासेयोचे पंच्याऐंशी तर राष्ट्रीय छात्र सेनेचे पंचवीस स्वयंसेवक उपस्थिती होते.
“एक पेड माँ के नाम " याच उपक्रमांतर्गत खुलताबाद तालुक्यातील खिर्डी या गावी १८ जुलै २०२४ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे नऊशे वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले असून या वर्षी एकूण चौदाशे वृक्षांचे रोपण महाविद्यालयाच्या रासेयो विभागाने केले आहे. या सर्व वृक्षांचे संगोपन रासेयो स्वयंसेवक करणार आहेत. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. अनंत कनगरे, डॉ. भाऊसाहेब शिंदे , श्रीमती सुवर्णा पाटील यांनी परिश्रम घेतले आहेत.