संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
देवगिरी महाविद्यालयात आज कवयित्री दिशा पिंकी शेख निमंत्रित
दिशा पिंकी शेख 'माझे लेखन माझी भूमिका' या सदरात देवगिरी महाविद्यालयात
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर, दि. १६ (प्रतिनिधी) - प्रगतिशील लेखक संघ आणि मराठी विभाग, देवगिरी महाविद्यालय यांच्या वतीने आयोजित 'माझे लेखन - माझी भूमिका' या सदरात तृतीयपंथीयांचे भावविश्व उलगडणारा कवितासंग्रह 'कुरूप' या कविता संग्रहाच्या कवयित्री तथा श्रीरामपूर येथील तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या सदरात त्या आपली भूमिका मांडतील आणि निवडक कवितांचे वाचन करतील.
नाटककार प्रा. दिलिप महालिंगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या उपक्रमात नाशिक येथील सुप्रसिद्ध कवी आणि समीक्षक डॉ. सुदाम राठोड कवितासंग्रहावर भाष्य करतील. याप्रसंगी देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.
शनिवार, दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता रवींद्रनाथ टागोर सभागृह, देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी साहित्य रसिकांनी आणि श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन प्रगतिशील लेखक संघाचे अध्यक्ष डॉ. सुधाकर शेंडगे आणि देवगिरी महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख, डॉ. समीता जाधव यांनी केले आहे.