Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

जीवनाच्या परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी संस्कृती,संस्कारासह वाचनक्षम बनले पाहिजे- जिल्हाधिकारी मा.दिलीप स्वामी

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 25 April 2025 04:59 AM

जीवनाच्या परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी संस्कृती,संस्कारासह वाचनक्षम  बनले पाहिजे- जिल्हाधिकारी मा.दिलीप स्वामी


दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर :

 दि. 24 एप्रिल 2025  म.शि.प्र. मंडळ संचालित देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने देवगिरी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष 2023-24 पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभाचे आयोजन दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी करण्यात आले. या पदवी वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री.दिलीप स्वामी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देवगिरी महाविद्यालय विकास समितीचे ज्येष्ठ सदस्य श्री पंडितराव हर्षे होते. तर विचारमंचावर म.शि.प्र. मंडळ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य श्री. त्रिंबकराव पाथ्रीकर, महाविद्यालय विकास समिती सदस्य, डॉ. आदित्य येळीकर, निमंत्रित सदस्य श्री. विवेक जैस्वाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर, उपप्राचार्य डॉ.रवी पाटील, डॉ.अपर्णा तावरे, डॉ. गणेश मोहिते या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. शेखर शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती. पदवी वितरण समारंभाच्या आरंभी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.अशोक तेजनकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासामध्ये देवगिरी महाविद्यालयाची भूमिका विशद केली. तसेच देवगिरी महाविद्यालय हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पहिले स्वायत्त दर्जा असणारे महाविद्यालय आहे. या स्वायत्त दर्जाच्या माध्यमातून देवगिरी महाविद्यालयामध्ये रोजगाराभिमुख, संशोधन व विकासपुरक अभ्यासक्रम राबविले जातात असे विचार मांडले. 
 या पदवी वितरण समारंभ प्रसंगी  छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी श्री. दिलीप स्वामी यांनी सध्या परिस्थितीमध्ये गुणांची टक्केवारी आणि गुणांचा फुगवटा यामधून विद्यार्थ्यांवर प्रचंड ताण निर्माण होत आहे म्हणून देवगिरी महाविद्यालयामध्ये साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा, विज्ञान यासंबंधी विशेष लक्ष दिले जाते त्यामधून विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होते ही महत्त्वाची बाब आहे. आजचा विद्यार्थी हा संस्कार आणि संस्कृती पासून दूर चालला आहे म्हणून विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये आई-वडील आणि गुरुजन यांचे ऐकले पाहिजे. या माध्यमातूनच आजचा विद्यार्थी संस्कारक्षम, आरोग्यक्षम, तंत्रस्नेही याबरोबरच वाचनस्नेही बनला पाहिजे. वाचन संस्कृती वृद्धींगत झाली पाहिजे. पालकांनी पण आपल्या कृतीतून वाचन संस्कृतीची जोपासना केली पाहिजे. खऱ्या अर्थाने जीवनाच्या परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर विद्यार्थ्यांनी संस्कारक्षम व वाचनक्षम बनले पाहिजे. आपले आई-वडील आणि गुरु यांच्या सल्ल्याने पुढील वाटचाल केली पाहिजे असे विचार व्यक्त करून पदवीधारक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अध्यक्षीय भाषणात श्री. पंडितराव हर्षे यांनी देवगिरी  महाविद्यालयाचे विद्यार्थी समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली भूमिका यशस्वीपणे निभावतील असा विश्वास व्यक्त केला. या पदवी वितरण समारंभामध्ये पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र  प्रदान करण्यात आली.



पदवी वितरण समारंभासाठी महाविद्यालयातील कला विज्ञान व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी, पालक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बाळासाहेब निर्मळ तर आभार उपप्राचार्य डॉ. गणेश मोहिते यांनी मानले.