Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

महापुरुषांचा मानवतावाद समजून घेतला पाहिजे - डॉ.धोंडोपंत मानवतकर

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 27 September 2024 12:04 PM

महापुरुषांचा मानवतावाद समजून घेतला पाहिजे - डॉ.धोंडोपंत मानवतकर


दखनी स्वराज्य छ.संभाजीनगर/प्रतिनिधी


"सबका मंगल हो.!, सबका कल्याण हो.!" हे तथागताच्या विचारातून आणि त्यांच्या नंतर सर्वच महापुरुषांच्या कार्यातून,विचारातून आलेले संपूर्ण मानवजातीचे हित, 'हाच खरा मानवतावाद आहे; मात्र त्यांच्या विचारातला आणि कृतीतला मानवतावाद आम्ही चिकित्सकपणे समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी कविसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त २५ ऑगस्ट रोजी, दुपारी १ वाजता, छ.संभाजीनगर येथील नागसेनवन परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर 'लॉ 'कॉलेजच्या महात्मा फुले सभागृहात "मानव प्रतिष्ठा-सृजनता साहित्य परिषद,महाराष्ट्र "च्या वतीने 'राज्यस्तरीय मानवतावादी कविसंमेलनाचे' आयोजन करण्यात आले होते. उद्घाटकीय भाषणात डॉ.धोंडोपंत मानवतकर पुढे म्हणाले की, अण्णाभाऊंच्या आयुष्यात कोणतीच परिस्थिती पुरक नसताना त्यांनी अहोरात्र संघर्ष करत सामाजिक परिवर्तनासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, यातून वेळ काढून वास्तव परिस्थितीवर आधारित कथा, कादंबऱ्या, नाटके, लोकनाट्ये, पोवाडे, लावणी, प्रवासवर्णन अशी सत्तर जवळपास पुस्तके लिहिली. त्यांनी आपल्या साहित्यात सर्व जातीधर्माच्या उपेक्षित,बहिष्कृत लोकांना नायक,नायिका बनवले आहे. समाज व्यवस्थेच्या प्रवाहाबाहेर असणारा दुर्लक्षित,उपेक्षित माणूस आपल्या साहित्याच्या केंद्रस्थानी उभा करून मानवतावाद जपला आहे. परंतु आज आमच्या सुशिक्षित लोकांचे सगळे प्रश्न सुटल्यामुळे ते समाजकार्यात किंवा साहित्यिक कार्यात सहभागी होत नाहीत,ही खंत आहे. "आम्हीही समाजाचे काही देणे लागतो" हा विचार सर्वांनी अंगिकारून समाज कार्यात सहभागी झाले पाहिजे,असा विचार डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी मांडला.

कार्यक्रमारंभी मान्यवरांच्या हस्ते साहित्यसम्राट अणाभाऊ साठे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या सत्कारानंतर प्रा.डॉ.कोंडबा हटकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून साहित्यरत्न अणाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांच्या उद्घाटकीय भाषणानंतर मानव-प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषदेचे संस्थापक,अध्यक्ष चंद्रप्रकाश जी.शिंदे यांनी साहित्य चळवळीची भूमिका विषद करताना सांगितले की, साहित्य परिषदेच्या अनेक संमेलनाद्वारे साहित्यिकांना एकत्र आणून त्यांचा समाजकार्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न राहणार आहे...जेणेकरून परिवर्तनाच्या कार्यात त्यांच्या विद्वतेचा उपयोग समाजाला होईल.

उदघाटन सत्राचे अध्यक्ष आंबेडकरवादी लेखक भीमराव सरवदे यांनी अध्यक्षीय समारोपात डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्य सम्राट अणा भाऊ साठे यांच्या वैचारिक भूमिकांचा उहापोह करून कविता लेखनाच्या भूमिकेबाबत उपस्थित कविंना मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सुभाष गवळी यांनी केले.

दुसऱ्या सत्रात ४ वाजता कवी राजू वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या 'राज्यस्तरीय मानवतावादी कविसंमेलनात' महाराष्ट्रातील नामवंत कवींनी सहभाग नोंदवला होता.

कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.विठ्ठल स.जाधव यांनी केले तर धन्यकुमार टिळक यांनी कवींचे आभार मानले.

या कार्यक्रमास साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानव-प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.