संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते डिजिटल क्लासरूमचे उदघाटन
(दै. दखनी स्वराज्य, महेंद्र नरके): जि. प. प्रशाला मुलांची पैठण येथे डिजिटल क्लासरूमचे उदघाटन प्रशालेचे माजी विद्यार्थी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
प्रशालेला शासनाच्या वतीने एलईडीचे एकूण 4 संच उपलब्ध झालेले आहेत. परंतु मोबाईलचा डाटा पुरत नसल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अल्प प्रमाणात वापर होता. ही बाब माजी विद्यार्थी यांच्या लक्षात आणून दिली व माजी विद्यार्थी यांच्या वतीने डिजिटल क्लासरूम साठी जीओचे वाय फाय कनेक्शन उपलब्ध करून दिले गेले. ज्यामुळे आता एकाच वेळी 4 डिजिटल क्लास चालतील व विद्यार्थ्यांना शिक्षणात याचा वापर होईल, असे मुख्याध्यापक अंकुश गाढे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समशेर पठाण केले. शाळेत अमुलाग्र बदल होतांना आपल्याला दिसत आहे, जो बदल होताना दिसत आहे तो आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे व समाज सहभागामुळे! आपण आम्हाला असेच सहकार्य करत रहावे जेणे करून आपल्या शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सामाजिक कार्यकर्ते रामसेठ अहुजा यांनी सांगितले, की खरोखर प्रशालेत झालेला बदल आम्हाला दिसत आहे. विद्यार्थ्यांनी या डिजिटल शिक्षणाचा लाभ घ्यावा ही माझी शाळा असल्यामुळे मला याचा सार्थ अभिमान आहे. राजुशेठ रोहरा यांनी सांगितले की अशी प्रशाला आमच्या काळात सुविधा नव्हती, तुम्ही विद्यार्थी फार नशीबवान आहात डिजिटल शिक्षणाचा आपल्या जीवनात परिपूर्ण फायदा करून घ्यावा तुमच्यातूनच नविन पढी घडणार आहे. पत्रकार मदन आव्हाड यांनी विद्यार्थ्यांना सल्ला देताना सांगितले की विद्यार्थ्यांनी डिजिटल मीडियाचा वापर विचारपूर्वक केला पाहिजे जेव्हा गरज असेल तेव्हाच मोबाईलचा वापर करावा. शालेय जीवनात मोबाईलचा जास्त वापर करू नये आपलं भविष्य आपल्या हातात आहे. माजी नगरसेवक प्रकाश वानोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. शाळेचे खेळाचे मैदान आम्ही स्वच्छ करून देऊ व सर्व क्रीडा प्रकाराचे मैदान आपणास तयार करून देऊ. तर राजेंद्र फलके यांनी एवढे मोठे प्रशस्त मैदान पैठण तालुक्यातील एकही शाळेकडे उपलब्ध नाही. त्याला डेव्हलप करून देण्याचे काम प्रशालेचे माजी विद्यार्थी करून देतील, असा शब्द दिला. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक अंकुश गाढे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीराम रेडिमेट्स संचालक राम सेठ अहुजा, रविराज एजन्सी संचालक राजू सेठ रोहरा, माजी नगरसेवक प्रकाश वानोळे, बॉबी फरसान संचालक राजुशेठ सोनारे, जेष्ठ पत्रकार मदन आव्हाड, माजी मुख्याध्यापक डी. ए.जाजे, मुख्याध्यापक राजेंद्र फलके, शिक्षक प्रमोद कुमार दौंड, मीनाक्षी टाक/शहाणे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समशेर पठाण यांनी केले तर अभार प्रदर्शन दिलीप तांगडे केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तारचंद हिवराळे, शेख फैय्याज, राजेश पाखरे, वैशाली कुटे, यास्मिन शेख, गणेश थोटे, बारगजे, ज्योती बलखंडे, शेख चाँद यांनी परिश्रम घेतले.