संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
(दखनी.स्वराज्य, पैठण) :- पैठण शहरातील नवीन कावसान भागातील ५ अनाथ व एकल बालकांना महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने अंतर्गत प्रतिवर्षी शिक्षणासाठी २७ हजार रुपयाचे अनुदान मंजूर झाले असून खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते मंजुरीचे पत्र अनाथ व एकल बालक यांना देण्यात आले.
अनाथ व एकल बालक शिक्षणापासून वंचित न राहता शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात यावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजने अंतर्गत अनाथ व एकल बालकांना वयाच्या १८ वर्ष पूर्ण होऊ पर्यंत प्रतीवर्ष २७ हजार रु अनुदान देण्यात येत असते. खासदार संदीपान भुमरे व कर्तव्यदक्ष संवेदनशील लोकप्रिय आमदार श्री विलास बापू संदीपान भुमरे यांच्या माध्यमातून व नवीन कावसान भागाचे नगरसेवक कृष्णा मापारी यांच्या विशेष प्रयत्नातून अनाथ व एकल बालकांचे प्रस्ताव मंजुरीसाठी महिला व बालविकास विभागाकडे पाठविण्यात आले होते. त्या प्रस्तावास बालविकास विभागाकडून मंजुरी देण्यात आली असून अनिकेत पवार, कुलदीप कांबळे, अर्णव क्षीरसागर, यश पवार, श्लोक राखुंडे या अनाथ व एकल बालकांना १८ वर्ष पूर्ण होऊ पर्यत शिकण्यासाठी प्रतिवर्षी २७ हजार रु अनुदान भेटणार आहे. प्रस्ताव तयार करण्यापासून ते मंजूर करण्यापर्यंत नगरसेवक कृष्णा मापारी यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. यावेळी नाथ संस्थानचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, जिल्हा दूध संघाचे संचालक नंदू आण्णा काळे, शहादेव लोहारे, निवृत्ती मापारी, दिपक मोरे, किशोर चौधरी यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.