Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

पैठण येथे शिवप्रेमींकडून शासनाचा जाहीर निषेध

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 27 September 2024 12:04 PM

पैठण येथे शिवप्रेमींकडून शासनाचा जाहीर निषेध


- मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या मंत्री, कांत्राटदार यांच्यावर गुन्ह्याची मागणी


(दै. दखनी स्वराज्य, प्रतिनिधी महेंद्र नरके, पैठण) - पैठण येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात सकल मराठा समाजाच्या वतीने राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्यांवर व मूर्ती शिल्पकार आपटे याच्यावर कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले. मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे मोठा गाजावाजा करत 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला आणि कोट्यवधी रुपये खर्चुन उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. काम सुरु असतानाच स्थानिक लोकांनी या पुतळ्याच्या कामासंदर्भात केलेल्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? हे महाराष्ट्राचे दुर्दैव असे निवेदनात नमूद केले आहे. सहा महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळतोच कसा? तेथील शिवकालीन किल्ला आजही मजबूत आहे. मग आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळला याचा अर्थ काय? मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या मंत्री, कांत्राटदार यांच्यावर गुन्ह्याची मागणी या निवेदनात शिवप्रेमी बांधवांनी केली आहे. महाराष्ट्राची जनता यांना कधीच माफ करणार नाही. सर्व शिवभक्तांच्या वतीने या घटनेचा काळया फिती लावून राज्य शासनाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुभाष नवथर, शिवाजी गाडे आणि संतोष तांबे यांनी मनोगते व्यक्त करत सत्ता आणि भ्रष्टाचारात गुंतलेल्या सरकारचा कडवट शब्दात समाचार घेतला.

यावेळी शेकडो तरुण सहभागी झाले होते.

पोलीस प्रशासनाच्या वतीने श्री मदने आणि श्री गायके यांनी निवेदन स्वीकारले.


*प्रतिक्रिया*

1) खारे पाणी आणि वाऱ्याचा वेग यामुळे पुतळा कोसळला, असे बालिश विधान करणाऱ्याला तत्काळ अटक करा.

- पवनराजे शिसोदे


2) भ्रष्टाचाराची परिसीमा गाठलेल्या राज्य सरकारच्या मस्तवाल मंत्री आणि कंत्राटदाराना अटक करा.

- माऊली मुळे


3) नारायण राणे, दीपक केसरकर यांच्या सारख्या समाज द्रोहीना धडा शिकवला पाहिजे. महाराजांचा अपमान करून अरे हे सरकार राष्ट्र द्रोही आहे.

- अनिल राऊत