Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

पालकांनी पाल्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे काळाची गरज - प्रा. पंढरीनाथ फुलझळके

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 02 June 2025 08:20 PM

पालकांनी पाल्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे काळाची गरज - प्रा. पंढरीनाथ फुलझळके


दखनी स्वराज्य वृत्तसेवा 

 पैठण येथील विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित "आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक प्रशिक्षण शिबिर 2025" आयोजित केलेले असून 31 मे रोजी सहाव्या दिवसाच्या सत्रात "विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत पालकाचे योगदान" या विषयावर बोलताना प्रा. पंढरीनाथ फुलझळके म्हणाले, की मुले मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या, टीव्हीच्या आधीन झाले आहेत. त्यामुळे पालकांसमोर मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेल्या आहेत. मोबाईल व टीव्हीपासून विद्यार्थ्यांना दूर करण्यासाठी पालकांनी घरात मुलांना अभ्यासाचे वातावरण निर्माण करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी स्वतः पालकांनी मुलांसमोर मोबाईल न पाहता त्यांच्यासमोर पुस्तक घेऊन  बसले पाहिजे परिणामी मुलेही अभ्यासाकडे आपोआप वळतील. आज अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाईल आहेत परंतु पुस्तक नाही, त्यासाठी पालकांनी शैक्षणिक साधन उपलब्ध करून दिले पाहिजे. शाळेत पालक सभेसाठी उपस्थित राहिले पाहिजे. मुलांबरोबर अभ्यासाविषयी चर्चा करणे, त्याचबरोबर दिवसातून एकदा तरी एकत्र बसून जेवण करणं काळाची गरज बनली आहे. मुलांचा भावनिक आणि मानसिक विकास होण्यासाठी पालकांनी सकारात्मक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. आपल्या मुलांची इतर मुलांबरोबर तुलना करू नये. तसेच पालकांनी विद्यार्थ्यांवर अनावश्यक दबाव न टाकता त्याचा कल, आवड ओळखून त्याच्या विकासासाठी प्रयत्न केला पाहिजे. हे विविध उदाहरण देत समजून सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक - पालक - विद्यार्थी समन्वय हा अत्यंत महत्त्वाचा आहे असे ते याप्रसंगी म्हणाले. त्यासाठी शाळा कॉलेजमधील शैक्षणिक कार्यक्रम विज्ञान प्रदर्शनास पालकांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी मूल्यशिक्षण हे अत्यंत गरजेचे आहे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता, सचोटी, सहकार्य भावना, शिस्त निर्माण करण्याचा पालकांनी प्रयत्न करावा. आपण जसे पाहतो तसे विद्यार्थी घडतो म्हणून पालकांनी मुलाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे .हे विविध उदाहरणे समजून सांगितली.
या सत्राचे प्रास्ताविक प्रिया गुडदे यांनी केले. पाहुण्याचा परिचय आशा अवधूत यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा मुळे यांनी केले, तर डॉ. जे. ई .येवले यांनी आभार  मानले. शिबिरास विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष विशाल पा. तांबे, आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य आर. बी. रामावत, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका एम. के कोळगे, तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दिनांक 26- 5- 2025 ते 5- 6- 2025 असे दहा दिवसाचे सदर शिक्षक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.