संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
येथील कै. रमेश वरपूडकर महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागात जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर आणि जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये बोलत होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सुप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.दिलीपकुमार कोरडे यांनी केले. त्यानंतर जागतिक पुस्तक दिन आणि विल्यम शेक्सपियर यांच्या जयंतीनिमित्त बोलताना डॉ.जायभाये यांनी जगातील अनेक पुस्तकांचे दाखले देत पुस्तकंच खऱ्या अर्थाने माणसाचे जीवन घडवतात. पुस्तकंच माणसाचे खरे मित्र आहेत. पुस्तक वाचनाने माणूस जात, धर्म, पंथ, लिंग याच्या पलीकडे जाऊन विचार करतो असे सांगताना आज समाजामध्ये जात धर्मावरून तेढ निर्माण झालेली असताना हे सगळे वातावरण सुस्थितीत आणि सुरळीत करण्यासाठी तरुणांनी आणि उच्चशिक्षित लोकांनी नवनवीन ग्रंथांचे वाचन करून त्या ग्रंथामधील वैश्विकता, प्रेम, सौहार्द, जिव्हाळा, आपुलकी, मानवता, सहकार्य इत्यादी वैश्विक तत्वांची पेरणी समाजात सातत्याने करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. याप्रसंगी बहिस्थ बहिस्थ एम.ए.इंग्रजी शिक्षण घेणारे आणि रेगुलर बी.ए.चे विद्यार्थी उपस्थित होते. याच कार्यक्रमांमध्ये बी.ए.तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. निरोपाच्या भाषणामध्ये रवी राठोड याने, महाविद्यालयात सर्व शिक्षक मोठ्या आपुलकीने शिकवताना शिक्षक-विद्यार्थी हे एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण होते असे सांगितले; तर कु.वर्षा ढेंबरे हिने महाविद्यालयात सर्वच प्राध्यापक वेगवेगळ्या पातळीवर जसे की अविष्कार संशोधन महोत्सव, विद्यापीठ युवक महोत्सव, विविध क्रीडा स्पर्धा इत्यादी अनुषंगाने सर्वच प्राध्यापक मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्याबद्दल सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी प्रथमेश वाघे याने तर आभार प्रदर्शन कु.गीतांजली पांचाळ हिने मानले. शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.