संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
(दखनी स्वराज्य,पुणे)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी येथे साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर यांनी आठवीच्या वर्गात नुकतीच आळाशी कविता शिकवली. तेव्हा वर्गातील दिया थिटे, अनुष्का वाबळे आणि संस्कृती विरोळे या तीन मुलींनी कवी हनुमंत चांदगुडे यांना पत्र लिहिले व त्यात त्यांना कविता आवडल्याचे सांगितले. तसेच आपण आमच्या शाळेत या. आम्ही तुम्हाला भेटू इच्छितो, अशी भावनिक साद घातली. अर्थात कवी येतील ही गोष्ट स्वप्नात देखील अपेक्षित नसताना एक निरागस भावना त्यांनी कवींपुढे अगदी नकळतपणे प्रकट केली. त्यांचे पत्र मिळताच चांदगुडे यांनी त्यांना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन करत एक दिवस नक्की शाळेत येऊ अशी ग्वाही दिली.
तेव्हा आपल्या शब्द पूर्ण करत अचानकपणे कवी हनुमंत चांदगुडे यांनी शाळेत प्रवेश करताच विद्यार्थ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. माईक हातात घेऊन चांदगुडे यांनी दिया थिटे, अनुष्का वाबळे आणि संस्कृती विरोळे यांना पुढे बोलावून त्यांचे अभिनंदन करत म्हटले, या तिघी केवळ निमित्त झाल्या पण मी तुमच्या सर्वांना भेटण्यासाठी या ठिकाणी आलो आहे, असे म्हणत त्यांनी सर्वांचीच मने जिंकली.
त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आळाशी कवितेची पार्श्वभूमी सांगत कविता समजून दिली. कवी आपले जगणे आपल्या कवितेतून मांडत असतो आणि ते मांडताना आपण समाजाचेही देणे लागतो या भावनेने प्रामाणिकपणे काम केले तर आयुष्यात यश निश्चित मिळते असा संदेश त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. शब्दांचे सौंदर्य समजावून सांगताना त्यांनी अनेक शब्दांची फिरवा फिरवा करत शब्दांचे अर्थ कसे बदलतात हे विद्यार्थ्यांना उदाहरणासह समजावून सांगताना ते म्हणाले, प्रत्येक बाईला आपला नवरा राम असावा असेच वाटते पण हाच नवरा शब्द जर उलटा करून वाचला तर त्याचा रावण होतो आणि तोच त्यांच्या नशिबी असतो, असे विनोदी शैलीत सांगत त्यांनी प्रत्यक्ष शब्दाची फोड करून त्याचा अर्थ त्यांना उलगडून सांगितला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन बेंडभर यांनी केले स्वागत गोरख काळे तर आभार किरण अरगडे यांनी मानले.