संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
राज्य शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षकाकडून विद्यार्थ्यांचा सन्मान
-माजी प्राचार्य बाबुराव साकोरे यांनी केले सचिन बेंडभर यांचे कौतुक
(दखनी स्वराज्य, पुणे प्रतिनिधी) -
महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आलेल्या वाबळेवाडी शाळेतील साहित्यिक शिक्षक सचिन शिवाजीराव बेंडभर यांचा सन्मान त्यांचे गुरू विद्याधाम प्रशाला शिक्रापूर मधील माजी उपप्राचार्य बाबुराव साकोरे यांनी स्वतः वाबळेवाडीत जाऊन शालेय परिपाठात शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन केला.
यावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधताना माजी उपप्राचार्य बाबुराव साकोरे म्हणाले, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याचप्रमाणे सचिन लहानपणापासूनच हरहुन्नरी व्यक्तिमत्व असलेला माझा आवडता विद्यार्थी होता. त्यावेळी शाळेत शिस्तीला अतिशय महत्व असायचे. शाळेची शिस्त कडक होती. ती मोडणाऱ्याला शिक्षा केली जायची.त्यावेळी
खाकी पॅन्ट, वरती पांढरा शर्ट आणि डोक्यावर टोपी असा शाळेचा गणवेश असायचा. एक दिवस सचिन टोपी विसरला. तेव्हा त्याने पांढऱ्या कागदाची एक टोपी तयार केली व ती डोक्यावर घातली. मात्र परिपाठाला जेव्हा ती टोपी वाऱ्याने उडून गेली, तेव्हा सर्व मुले हसायला लागली. तेव्हा मी त्याला समोर बोलावले. आता त्याला जबर शिक्षा होणार असेच सर्व मुलांना त्यावेळी वाटले. पण मी मात्र त्याच्यावर न रागवता त्याला शाबासकी दिली व सर्व मुलांना सांगितले, मित्रांनो, शिक्षण केवळ पुस्तकी न घेता आपल्या रोजच्या जीवनात येणाऱ्या अडचणींवर आपण मात केली पाहिजे. ती जर आपल्याला करता आली तर आपले शिकणे सार्थकी लागले, असे म्हणता येईल. कारण अडचणीतून बाहेर काढते तेच खरे शिक्षण बाकी फक्त कागदी डिगऱ्या आहेत, असे म्हणत सरांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी सर्वजण भावूक झाले.