संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पुरी (ओडिशा), ४ एप्रिल – ५७व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या महिला संघाने दिमाखदार खेळी करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अंतिम सामन्यात त्यांनी यजमान ओडिशावर २५-२१ असा थरारक विजय मिळवला. दुसरीकडे, पुरुष गटात रेल्वेच्या संघाने गतविजेत्या महाराष्ट्राला ३६-२८ अशी मात देत बाजी मारली. राष्ट्रीय खो-खो स्पर्धेतील महाराष्ट्राच्या महिलांचे हे २६ वे तर रेल्वेचे १२ वे अजिंक्यपद ठरले आहे.
महिला गटात महाराष्ट्राची विजयी घोडदौड कायम
पुरी येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत यजमान ओडिशाचा प्रतिकार मोडून काढला. सामन्याच्या मध्यंतराला दोन्ही संघ १०-१० अशा बरोबरीत होते. मात्र, दुसऱ्या डावात महाराष्ट्राने अचूक रणनीती आणि दमदार संरक्षणाच्या जोरावर सामन्यावर वर्चस्व मिळवत विजयावर शिक्कामोर्तब केले.
प्रियांका इंगळे (१.३० मि. संरक्षण), रेश्मा राठोड (१.४० मि. संरक्षण) व अश्विनी शिंदे (१.४० मि. संरक्षण) यांनी पहिल्या डावात तर तन्वी भोसले (३ मि. संरक्षण), संपदा मोरे (१.३० मि. संरक्षण) आणि सानिका चाफे (१.२० मि. संरक्षण) यांनी दुसऱ्या डावात उत्कृष्ट खेळ करत विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आक्रमणात रेश्माने ६ व प्रियांकाने ४ गडी बाद करत विजयात मोलाची भूमिका बजावली.
ओडिशाकडून शुभश्री सिंग (१.२० मि. संरक्षण व ६ गुण) आणि स्मरणिका शाहू (नाबाद १.३० मि. संरक्षण व ४ गुण) यांनी कडवी झुंज दिली, मात्र ती अपुरी ठरली.
पुरुष गटात रेल्वेची विजयी पताका
पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात रेल्वेने महाराष्ट्रावर ३६-२८ अशी निर्णायक मात करत अजिंक्यपद आपल्या नावावर केले. मध्यंतराला रेल्वेने २१-१२ अशी निर्णायक आघाडी घेत सामन्यावर नियंत्रण मिळवले. दुसऱ्या डावात महाराष्ट्राने १५-१५ अशी जोरदार मुसंडी मारली पण रेल्वेने पाहिल्या डावात घेतलेली आघाडी महाराष्ट्राच्या पराभवाचे कारण ठरली.
रेल्वेकडून अरुण गुणकी (१.२० मि. संरक्षण व ६ गुण ), राहुल मंडल (१.४० मि. संरक्षण व ४ गुण), दिलीप खांडवी (६ गुण), जगन्नाथ दास (१.४० मि. संरक्षण व ४ गुण) व महेश शिंदे (१.४०, १.२० मि. संरक्षण) यांनी अष्टपैलू कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला.
महाराष्ट्राच्या संघाकडून लक्ष्मण गवस आणि मिलिंद चावरेकर यांनी प्रत्येकी १.४० मि. संरक्षण करत विजयासाठी जोरदार प्रयत्न केले होते. पियुष घोलमने ६ गुण मिळवत, तर निहार दुबळे, रुद्र थोपटे आणि सुयश गरगटे यांनी प्रत्येकी ४ गुण मिळवत विजयासाठी केलेले प्रयत्न अपुरे पडले व महाराष्ट्राला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
महिला उपांत्य सामन्यांत महाराष्ट्र आणि ओडिशाचा दबदबा
महिला गटातील उपांत्य सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीचा २६-१६ असा पराभव केला, तर ओडिशाने एअरपोर्ट ऑथॉरिटीवर २५-१६ असा एक डाव राखून सहज विजय मिळवला.
पुरुष उपांत्य सामन्यांतही रंगला थरार
पुरुष गटात महाराष्ट्राने यजमान ओडिशावर २७-२५ अशी निसटती मात केली. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात रेल्वेने कोल्हापूरवर ३६-३२ असा एक डाव राखून ६ गुणांनी विजय मिळवला.
संपूर्ण स्पर्धेवर महाराष्ट्र महिला संघाची छाप, पुरुष गटात मात्र रेल्वेचा दम
महाराष्ट्राच्या महिला संघाने अखेरपर्यंत चिकाटीने खेळ करत विजेतेपद आपल्या नावे केले, तर पुरुष गटात अंतिम टप्प्यात रेल्वेने आपली ताकद दाखवली. या स्पर्धेत महाराष्ट्र, रेल्वे, ओडिशा यांचे वर्चस्व ठळकपणे दिसून आले.
-----------------------------------------------------------------------
गतविजेत्या महाराष्ट्राच्या पुरुष संघाला पराभवाचा धक्का
पुरुषांच्या महाराष्ट्र वि. ओडिशा या काल सायंकाळीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मैदान प्रचंड निसरडे झाल्याने खेळाडूंची प्रचंड दमछाक झाली व पुढे मैदानाची अवस्था आणखी खराब झाल्याने हा सामना थांबवावा लागला व रद्द झालेला सामना आज सकाळच्या सत्रात खेळावा लागला. त्यानंतर लगेच अंतिम सामना खेळावा लागला. खरतर राष्ट्रीय स्पर्धेत एकाच सत्रात उपांत्य व अंतिम सामना खेळणे हे योग्य नव्हे. त्याचबरोबर विश्वचषकतील भारतीय संघाचा कर्णधार प्रतीक वाईकर काल सायंकाळ पासून तापाने फणफणला होता त्याचा परिणाम सुध्दा खेळाडूंच्या मानसिकतेवर झाल्याचे दिसत होते. त्यामुळेच महाराष्ट्राला पराभवाचा सामना करावा लागला. – प्रा. डॉ. चंद्रजीत जाधव ( सह. सचिव भारतीय खो-खो महासंघ).
---------------------------------------------------------------
महिला संघाचे प्रशिक्षक नरेंद्र मेंगळ (ठाणे) यांनी विजयाचे श्रेय खेळाडू व महाराष्ट्राच्या व्यवस्थापनाला दिले. संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुली उत्कृष्ट खेळल्या असून गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची विजयी पताका फडकत ठेवण्याचे काम महाराष्ट्राच्या मुलींनी केल्याचे त्यांनी सांगितले.
------------------------------------------------------------------
महाराष्ट्राचा विजेता महिला संघ: अश्विनी शिंदे (कर्णधार), संपदा मोरे, प्रीती काळे, संध्या सुरवसे, सुहानी धोत्रे, तन्वी भोसले (धाराशिव), सानिका चाफे, रितिका मगदूम, प्रगती कर्नाळे (सांगली), प्रियांका इंगळे, दिपाली राठोड, ऋतिका राठोड (पुणे), पायल पवार (रत्नागिरी), मनिषा पडेल (नाशिक), रेश्मा राठोड (ठाणे). प्रशिक्षक : नरेंद्र मेंगळ (ठाणे), सहाय्यक प्रशिक्षक : अनिल रौंदाळ (नंदुरबार), व्यवस्थापक : संध्या लव्हाट (अहिल्यानगर).