Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे अत्यंत प्रभावी माध्यम -प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 10 October 2024 08:28 AM

राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे अत्यंत प्रभावी  माध्यम -प्राचार्य डॉ.आबासाहेब देशमुख


(दखनी स्वराज्य, सोलापूर) -

  राष्ट्रीय सेवा योजनेच्या नियमित कार्यक्रम व विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून राबवलेल्या विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार, सामाजिक कार्याची आवड, सामाजिक समस्यांचे भान व त्याचे उकलन करण्याचे कौशल्य, नेतृत्व गुण, संघटन कौशल्य, आत्मविश्वास, धाडस, चिकाटी, जिद्द, प्रत्येक कार्यक्रमात सहभाग व पुढाकार तसेच राष्ट्रभक्ती व राष्ट्प्रेम यासारखे अनेक गुण विकसित होतात व कायमस्वरूपी अंगी रुजविले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे राष्ट्रीय सेवा योजना हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे असे प्रतिपादन प्रमुख वक्ते शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे माजी व महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाचे अध्यक्ष प्राचार्य 
डॉ. आबासाहेब देशमुख यांनी केले ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संचलित मॉडेल कॉलेज, घनसांगवी येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना उद्बोधन शिबिरात   मार्गदर्शन करताना ते बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजनेत मनापासून सहभागी झालेला विद्यार्थी त्याच्या भावी आयुष्यात  कोणत्याही क्षेत्रात गेला तरी तो चांगले काम करतो व यशस्वी होतोच असेही ते पुढे म्हणाले.
मॉडेल कॉलेज, घनसावंगी येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने "स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत"  उद्बोधन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  शिवछत्रपती महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ चंद्रसेन कोठावळे हे होते. प्रमुख पाहुण्यांची ओळख व शिबिराचा उद्देश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामराव चव्हाण यांनी स्पष्ट केला. यावेळी कार्यक्रमास डॉ बद्रीनाथ घ राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक डॉक्टर बद्रीनाथ भोंगे, प्रा.संदीप पाटील, पैठण तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन श्री अरुण काळे तसेच कन्या प्रशाला पैठणचे मुख्याध्यापक श्री बजरंग काळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे  पूजन करण्यात आले. स्वागत गीत विद्यार्थिनींनी गायले. यावेळी महाविद्यालयातील विविध स्पर्धेत क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा.खंडू नवखंडे यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने एड्स जनजागृती, व्यसनमुक्ती, रेड रिबन क्लब, वृक्षारोपण, महिला आरोग्य जनजागृती यासारख्या महाविद्यालयाने राबविलेल्या विविध उपक्रमाची माहिती दिली. डॉ बद्रीनाथ घोंगे तसेच डॉ संदीप पाटील यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
       मॉडेल कॉलेजचे प्राचार्य डॉ रामराव चव्हाण यांनीही विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. चंद्रसेन कोठावळे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे राष्ट्र उभारणीत महत्त्व सांगितले. 
       सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख डॉ बाळासाहेब सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रमाधिकारी डॉ ज्ञानेश्वर खोजे यांनी केले. यावेळी ग्रामीण रुग्णालय घनसावंगीचे श्री देवानंद  इंगोले, श्री पाटणकर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. भागवत गोरे सह सर्वांनी योगदान दिले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी स्वयंसेवक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.