संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
समाजमनाचे प्रतिबिंब जाणून घ्यायचे असेल तर त्या त्या काळातील कविता, कथा, कादंबऱ्या वाचायला हव्यात. व्यवस्थेला जनमानसाची जाणीव करून देण्याचे काम साहित्यिक करत असतात. दुर्दैवाने राज्यकर्त्यांच्या काळजापर्यंत कविता पोहचत नाही. साहित्यापासून त्यांची नाळ तुटलेली आहे. जाणीव सशक्त असल्याने कवी सर्वसामान्यांपेक्षा वेगळा विचार करतो असे प्रतिपादन म.सा.प.केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा शिवाजी महाविद्यालय रेणापूर जि.लातूर चे मराठी विभाग प्रमुख प्रो.डाॅ.जयद्रथ जाधव यांनी केले. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्त एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य द्वारा आयोजित ३३ व्या राज्यस्तरीय ऑनलाईन एकता काव्य संमेलनात ते उद्घाटक पदावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जुन्नर जि.पुणे येथील सुप्रसिद्ध बालसाहित्यिक मा.शिवाजी चाळक हे होते.
एकताचे संस्थापक अध्यक्ष तथा म.सा.प.संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य साहित्यिक अनंत कराड, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर, प्रवक्ता मल्हारी खेडकर, मराठवाडा विभागीय अध्यक्ष प्रा.डाॅ.प्रकाश वाकळे, एकताचे अहिल्यानगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पत्रकार बाळासाहेब कोठुळे, परभणी जिल्हा उपाध्यक्ष मेघा नांदखेडकर, महानगरीय अध्यक्षा प्रा.शोभाताई घुंगरे आणि मराठवाडा युवा आघाडी विभागीय संघटक सुनिल महाराज केकाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कविसंमेलनात दै.पुढारी चे उपसंपादक सूर्यकांत वरकड (आष्टी) यांनी 'माय मराठी' व 'रिती दावण' या दर्जेदार रचना पेश केल्यानंतर बीड चे कवी राजेंद्र लाड यांच्या 'याला माणूस म्हणावे काय?' व 'आईशपथ खरं सांगतो' या रचनांनी श्रोते भारावून गेले. अरूण कांबळे (धाराशीव) यांनी 'का बंद करता वाडीवस्तीच्या शाळा' व 'जरातरी लक्ष द्या ना समाजाकडं' या अंतर्मुख करणाऱ्या कविता सादर केल्या. यानंतर नाशिकचा युवाकवी दर्शन शिंगणे याने 'बा' नावाची भावनिक रचना ऐकवून सर्वांना मंत्रमुग्ध केले. 'आईचे धाडस' ही नेवासा जि.अहिल्यानगर येथील कवी गोरक्षनाथ पवार यांची रचना टाळ्या मिळवून गेली. नंदूरबार येथील युवाकवी गणेश वसावे याने 'प्रवास माझा करिअरचा' ही हटके कविता पेश केली. तात्याराव पवार (पैठण जि.संभाजीनगर) यांनी 'ये रे ये रे चांदोमामा' हे बालकाव्य व 'फुलांगार' ही रचना सादर केली. काव्य संमेलनाचे अध्यक्ष शिवाजी चाळक यांनी 'जंगलसभा' ही बालकविता व 'बाई आणि भुई' ही स्रीजाणीवेची रचना पेश करून उपस्थितांना अंतर्मुख केले. या संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन नाशिक येथील सुप्रसिद्ध युवाकवी अमोल चिने याने केले.
एकताचे प्रदेश संघटक देवीदास शिंदे आणि प्रदेश युवक सरचिटणीस बलराम मनिठे यांच्या संकल्पनेतून संपन्न झालेल्या या संमेलनाचे प्रास्ताविक एकताचे राहुरी जि.अहिल्यानगर तालुका प्रतिनिधी बाळासाहेब मुंतोडे यांनी केले. यावेळी एकताचे शेवगाव तालुका प्रतिनिधी अण्णासाहेब बोडखे, डाॅ.अनिकेत कराड, सहदेव मुळे, संजय माकोणे, विष्णू काकडे, सुरेश आघाव, पंकज निलख, संजय पाटील, भागवत कंठाळे, गणेश पटारे, दिपक पाठक, प्रियंका अरोटे, प्रतिक्षा विटनोर, सोनाली कराळे, अभिजित गायकवाड, दिपाली पगार, आकाशदीप शिंदे यांच्यासह एकताचे राज्यभरातील पदाधिकारी आणि कवी कवयित्री मोठ्या संख्येने उपस्थित होते.