संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
शाळांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवावी- सचिन बेंडभर पाटील
-जनमित्र कै. दिनकरराव आवटे यांच्या 37 व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
(दखनी स्वराज्य, पुणे प्रतिनिधी )
तंत्रज्ञानाच्या युगात मुलांचे वाचन कमी होत चालले आहे. तंत्रज्ञानाच जसे फायदे आहेत त्याप्रमाणे तोटे देखील आहेत. परंतु वाचनाचा मात्र फायदाच फायदा आहे. त्यामुळे आपली संस्कृती जपायची असेल तर शाळांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजवली पाहिजे, असे मत महाराष्ट्र शासन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक व साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांनी जनमित्र कै. दिनकरराव आवटे मित्र मंडळ महाळुंगे पडवळ, पिंपरी चिंचवड व पुणे परिसर यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले.
जनमित्र कै. दिनकरराव आवटे मित्र मंडळ महाळुंगे पडवळ, पिंपरी चिंचवड व पुणे परिसर यांच्या वतीने जनमित्र कै दिनकरराव आवटे यांच्या 37 व्या स्मृतिदिनानिमित्त बक्षीस वितरण व गुणवंत भूमिपुत्रांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी बोलताना बेंडभर पाटील म्हणाले, तंत्रज्ञानाच्या युगात संगणकाचा व भ्रमणध्वनीचा वापर करत असताना वाचन संस्कृती सुद्धा जपली पाहिजे. वाचनाने जीवन समृद्ध होते. नवीन गोष्टींचा स्वीकार करत असताना जुन्या परंपराही आपण जपल्या गेल्या पाहिजेत हे सांगत असताना त्यांनी जुनी आणि नवीन यांची सांगड असलेली आजोळी कविता विद्यार्थ्यांना गाऊन दाखवली.
ते पुढे म्हणाले वाचनाबरोबरच गोष्टीही मुलांच्या जीवनातून हद्दपार होत चाललेल्या आहेत. ससा आणि कासवाची गोष्ट सांगून त्यांनी त्या गोष्टी नंतर पुढे काय घडते ते आपल्या कवितेत सांगत तो विजयाचा स्वामी ही कविता विद्यार्थ्यांना ऐकवली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारोडी गावच्या सरपंच मंगलताई हुले उपस्थित होत्या. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. कल्पना बळीवंत यांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पाडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माराम जगदाळे यांनी केले. तर आभार अजय आवटे यांनी मानले.