संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
संत चोखामेळा महाराज यांचा समतेचा विचार घेऊन निघालेल्या चोखामेळाप्रेमींची नाथ भूमी पैठण येथे मांदियाळी जमणार - संतोष तांबे
दुसरे चोखामेळा साहित्य संमेलन पैठणची आढावा बैठक संपन्न
दखनी स्वराज्य, पैठण -
संत चोखामेळा अध्यासन केंद्र व वृंदावन फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार 28 व रविवार 29 सप्टेंबर रोजी तीर्थक्षेत्र पैठण येथे होणाऱ्या दुसऱ्या संत चोखामेळा साहित्य संमेलन 2024 ची आढावा बैठक संतोष तांबे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. याप्रसंगी संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक सचिन पाटील, ॲड महारुद्र जाधव, प्रा.संतोष गव्हाणे, बजरंग काळे, गणपत मिटकर, संतोष सरोदे, आर.बी. रामावत, संत साहित्याचे अभ्यासक डॉ जालिंदर येवले आदींची उपस्थिती होती.
दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन 2024 च्या
बोधचिन्हांचे अनावरण देवशयनी आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी धाराशिव शहरातील संत मुक्ताबाई मंदिरात
संत मुक्ताबाई यांच्या परम भक्त, अभ्यासक व त्यांच्या विचार कार्याच्या प्रसारक मंगलताई वाघ यांच्या शुभहस्ते करण्यात आलेले आहे.
"सोयराबाई : संत, कवी आणि माणूस " असा मध्यवर्ती आशय घेऊन संपन्न होत असलेले दोन दिवसीय साहित्य संमेलन एकूण सहा सत्रात विभागून होणार असून महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील नामवंतांच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र पैठण येथे शनिवार 28 व रविवार 29 सप्टेंबरला संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनात परिसंवाद, चर्चासत्र, कविसंमेलन, संत साहित्य प्रदर्शन, उद्बबोधन व संत साहित्याचे देखावे असणार आहेत. सदरील संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून संत सोयराबाई यांच्या साहित्याचे अभ्यासक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणेच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे असणार आहेत.
संत चोखामेळा महाराज यांचा समतेचा विचार घेऊन निघालेल्या चोखामेळाप्रेमींची नाथ भूमी पैठण येथे मांदियाळी जमणार असून, पैठण येथील दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन यशस्वीतेसाठी पैठणकर ग्रामस्थांची स्वागत समिती व संयोजन समिती स्थापन करुन सदरील संमेलन यशस्वी केले जाईल अशी माहिती संतोष तांबे यांनी दिली. चोखामेळा साहित्य संमेलन पैठण संबंधित आढावा बैठक नुकतीच पैठण येथील विविध कार्य परिघातील मान्यवरांच्या उपस्थितील संपन्न झाली. लवकरच संमेलनाच्या आयोजनासाठी स्थानिक कार्यकारणी गठित करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.
संत चोखामेळा अध्यासन केंद्राचे संस्थापक श्री सचिन पाटील यांचा श्रीहरी कृपा सेवा संस्था आणि अन्नछत्र प्रमुख श्री उदावंत साहेब, सचिव गणपत मिटकर आणि सेवेकरी बांधवांनी सत्कार केला.