संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
महिला पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच कार्यालयीन कर्मचारी यांच्या आरोग्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर व शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय, यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 01/10/2025 रोजी सकाळी 11:00 वाजेला “स्वस्थ नारी सशक्त परिवार” अभियान अनुषंगाने कैलासशिल्प सभागृह येथे आरोग्य व तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मा. डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक, मा. अन्नपुर्णा सिंह, अपर पोलीस अधीक्षक, यांचे सह मा. अरविंद गायकवाड (विशेष कार्य अधिकारी, कर्करोग रुग्णालय.) डॉ.ऋषिकेश खाडिलकर, विभाग प्रमुख, कर्करोग प्रतिबंध, डॉ. अनघा वरुडकर, प्राध्यापक व प्रमुख सर्जिकल ऑन्कोलॉजी, डॉ. अर्चना राठोड, प्राध्यापक व स्त्रीरोगतज्ञ, डॉ. भक्ती कल्याणकर, प्राध्यापक व स्त्रीरोगतज्ञ यांचेसह मोठयाप्रमाणावर पोलीस कुटूंबीय उपस्थित होते.
याप्रसंगी मा. डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक यांनी सांगितले कि, पोलीसांच्या व्यस्त व तणावपुर्ण जीवनशैलीत स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष ही चिंतेची बाब आहे. विशेषत: वयाचे 40 वर्षानंतर नियमित आरोग्य तपासणी न केल्यास अनेक आजार उशिराने निदान होतात. त्यातही समाजात आजही कर्करोगाबाबत भीती, गैरसमज, असल्याने त्याबाबत सहसा कोणी चर्चा करत नाहीत. त्यातही स्त्रीयांमध्ये कर्करोगाची लक्षणे आढळली तर कुटूंब व समाज त्याव्यक्तीकडे अत्यंत चिंताजनक बाब म्हणुन बघते. परंतु याबाबत सामाजिक दृष्टीकोन बदलण्याची गरज असुन कर्करोगाचे प्रारंभी निदान झाले तर तो पुर्णपणे बरा होऊ शकतो. त्यामुळे विशेषत: महिलांच्या बाबतीत घर, कुटूंब, जबाबदाऱ्या यांच्या आड त्यांनी स्वत:च्या आरोग्याची उपेक्षा न करतात. त्यांनी आरोग्य तपासणी ही वैयक्तिक जबाबदारी नसून कुटूंबासाठी केलेली गुंतवणूक समजणे लाभदायक ठरेल असा मोलाचा सल्ला यावेळी दिला आहे.
त्याचप्रमाणे डॉ. अरविंद गायकवाड, यांनी ओरल कॅन्सर बदल विशेष भर देवुन सांगितले कि, तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन, गुटखा, मद्यपान आणि तोंडातील स्वच्छतेकडे दुलर्क्ष या कारणामुळे या कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक वाढत आहे. त्यामुळे तोंडातील किरकोळ जख्मा, पांढरे डाग, गिळताना त्रास हि लक्षणे दिसताच त्वरित तपासणी करणेबाबत सल्ला दिला आहे.
यावेळी कर्क रोग तज्ञ डॉ. अर्चना राठोड यांनी सांगितले कि, सध्या कर्करोगाचा प्रभाव वाढत असुन 10 व्यक्तीपैकी 1 व्यक्तीला कर्करोग (कॅन्सर) होण्याचा संभव अधिक आहे. त्यातही सध्या 29 महिला मागे 01 महिलेला स्तनांचा कर्करोगाचा धोका असतो. स्त्रीयांना स्तनांचा व गर्भाशयाचा कर्करोग होण्याचे प्रमाणात वाढ होत आहे. याला प्रामुख्याने शहरी भागातील महिलामध्ये वाढते शहरीकरण,आधुनिक जिवनशैली, व्यायामाचा अभाव, जंकफुडचे अधीक सेवन, त्यामुळे स्थुलतेचे प्रमाण वाढत आहे त्याचबरोबर कर्करोगाचे प्रमाणही वाढत आहे.
महिला या वेळीच कर्करोगाचे तपासणी करण्यास भितात यामुळे गर्भाशय मुखाचा व स्तनांचा कर्करोग हा प्रभावी पणे वाढतो. महिलांना प्रत्येक वर्षी या तपासण्या करणे अत्यावश्यक आहे. यामध्ये त्यांना काही असामान्य गोष्टी अगर बदल जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार घेणे अत्यावश्यक आहे. कोणताही कर्क रोगाबाबत मनामध्ये भिती ठेवु नये. कर्क रोगाचे निदान लवकर झाल्यास व योग्य उपचार मिळाल्यास कर्क रोग हा संपुर्ण पणे बरा होवु शकतो. तसेच गर्भाशय मुखाचा कर्करोग हा एच.पी.व्ही. वायरस मुळे होवुन हा होण्याचे प्रमुख कारणे कमी वयात लग्न होेणे, तीन पेक्षा अधिक मुले होणे, असुरक्षित लैगिंक संबध, स्वच्छेतेचा अभाव, तंबाखु सेवन, इ. कारणाने होवु शकतो.
हा कर्करोग पुर्व स्थितीत ओळखण्यासाठी किंवा टाळण्यासाठी “पॅप स्मिअर टेस्ट” ही तपासणी दरवर्षी 30 वर्षावरिल प्रत्येक महिलांनी करणे आवश्यक आहे. तसेच 9 ते 27 वर्ष वयोगटातील मुलींनी एच.पी.व्ही. ही लस घेतल्यास या रोगापासुन प्रतिबंध होवु शकतो. कर्करोग झाला म्हणजे मृत्यू होणारच असे नाही. त्यामुळे 30 वर्षावरिल महिलांनी या तपासण्या करणे अत्यंत गरजेच्या आहेत असा सल्ला व मार्गदर्शन त्यांनी यावेळी केल आहे.
त्याचप्रमाणे डॉ. भक्ती कल्याणकर व डॉ. ऋषिकेश खांडेलकर यांनी सुध्दा कर्करोगाचे विविध पैलुवर उपस्थितांचे मार्गदर्शन केले आहे.
याप्रसंगी जिल्हा पोलीस दलातील 118 महिला पोलीस अंमलदार व पोलीस कुटूंबयाचे आज आरोग्य तपासणी शिबीरामध्ये ब्लड टेस्ट, पॅप स्मिअर टेस्ट (PAP) तपासणी करण्यात आली आहे. याचप्रमाणे तज्ञ डॉक्टरांचे सल्लानुसार महिला अंमलदार यांना स्वस्तन परिक्षण तपासणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. ज्यामुळे त्या दर महिण्याला स्वत:ची स्वत: तपासणी करू शकतील. व काही असामान्य वाटल्यास तज्ञ डॉक्टरांचा वेळीच सल्ला घेवुन पुढील उपचार घेणे शक्य होईल.
कार्यक्रमाचे समारोप व आभार हे मा.अन्नपुर्णा सिंह, अपर पोलीस अधीक्षक यांनी केले असुन मान्यवरांनी त्यांचे वेळात वेळ काढुन कार्यक्रमास उपस्थिीती दिल्या बद्दल तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशिल असलेल्या सर्वांचे त्यांनी छ.संभाजीनगर ग्रामीण पोलीस दला तर्फे आभार व्यक्त केले आहे.
या उपक्रमांचे यशस्वी नियोजन हे मा. डॉ. विनयकुमार राठोड, पोलीस अधीक्षक, मा. अन्नपुर्णा सिंह, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली श्री. गौतम पातारे, पोलीस उप अधीक्षक (मु.) श्री. प्रशांत महाजन, पोलीस निरीक्षक, श्री. अण्णासाहेब, वाघमोडे, रा.पो.नि. श्री. सिध्देश्वर गोरे, स.पो.नि. श्रीमती सरला गाडेकर, स.पो.नि. श्री. प्रदिप भिवसने केले असुन कार्यक्रमांचे सुत्रसंचालन परमेश्वर आढे यांनी केले आहे.