संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पैठण येथील विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित "आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक प्रशिक्षण शिबिर 2025" आयोजित केलेले असून 29 मे रोजी चौथ्या दिवशीच्या सत्रात "व्यक्तिमत्व विकासात कला, क्रीडा व साहित्याचे महत्त्व" या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. राधाकृष्ण अकोलकर संतपीठ पैठण यांनी माणूस जगात विचार आणि कृतीने ओळखला जातो. विचार आणि कृतीमध्ये विकास करताना व्यक्तिमत्व विकास हा महत्त्वाचा घटक आहे. शिक्षक म्हणून उभा राहिल्यानंतर विद्यार्थी समजून घेणे ही एक कला आहे. त्यासाठी शिक्षकांमध्ये साहित्य वाचन हा महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थी घडवताना विद्यार्थ्यांचे सुप्त गुण ओळखता आले पाहिजे. आई नंतर शिक्षक हा विद्यार्थ्यांना घडवताना महत्त्वाचा गुरु आहे. त्यासाठी कला, क्रीडा व साहित्याची जाण असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे याप्रसंगी डॉ. अकोलकर मार्गदर्शन करताना म्हणाले. त्याचबरोबर शिक्षक हा कलाकार असणे गरजेचा आहे. रामायण, महाभारत, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ महाराज यांचे विविध उदाहरण देत पुस्तका बरोबरच शिक्षक आचरणातून शिकवत असतो असे त्यांनी सांगितले. शेवटी म्हणाले की, माणसाचे व्यक्तिमत्व घडविण्यासाठी साहित्य अथवा ग्रंथ वाचन आवश्यक आहे. त्यामध्ये चरित्र, आत्मचरित्र, कथा, कादंबरी, कविता, नाटक, वैचारिक निबंध अशा विविध प्रकारच्या साहित्याचे वाचन केले पाहिजे. साहित्य वाचनाने व्यक्तीला प्रेरणा मिळते. आज मात्र नवीन पिढी ग्रंथापासून दूर चालले असून गुगल व व्हाट्सअपचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. तरी ते ग्रंथास पर्याय ठरू शकत नाही, त्यासाठी नवीन पिढीस ग्रंथाचे महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे. महाराष्ट्र घडविण्यात धारकरी व वारकरी यांचा मोलाचा वाटा आहे. संत साहित्यामुळे अध्यात्मिक ग्रंथ निर्मिती झाली. ग्रंथाशिवाय व्यक्तिमत्त्वाचा विकास शक्य नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये साहित्य वाचनाची गोडी निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी. आर.पठाण यांनी केले. पाहुण्याचा परिचय डॉ. जे. ई.येवले यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य आर.बी. रामावत यांनी केले तर सौ. कविता दसपुते यांनी आभार मानले. शिबिरास आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूलचे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दिनांक २६ मे ते ५ जून २०२५ असे दहा दिवसाचे सदर शिक्षक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.