संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पैठण- पैठण येथील विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचालित "आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षक प्रशिक्षण शिबिर 2025" आयोजित केलेले असून 2 जून 2025 रोजी सातव्या दिवसाच्या सत्रात गणोरी जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक श्री. अनिल देशमुख "शालेय उपक्रम आणि शैक्षणिक साहित्याचे महत्त्व" या विषयावर मार्गदर्शन करताना, शिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून काम करताना जे समाधान मिळते, ते इतर क्षेत्रात मिळत नाही. आपल्या मनात विद्यार्थ्याबद्दल आत्मीयता असणे गरजेचे आहे असे ते याप्रसंगी म्हणाले. शिक्षण क्षेत्रातील कोणतीही कृती, उद्दिष्टाशिवाय नाही. छोट्या छोट्या कृतीतून मोठा उपक्रम पूर्ण होतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीमध्ये शालेय उपक्रमाला फार महत्त्व आहे. शनिवार दप्तर मुक्त शाळा मधील विविध उपक्रम विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीच्या मुलाखती घेणे, खराब झालेले पेन फेकून न देता एका बॉक्समध्ये जमा करणे, वाढदिवसाच्या दिवशी शाळेमध्ये वाचनालयासाठी भेट देणे, वृक्ष मोजणीसाठी क्यू आर कोड लावणे, सेन्स फॉरेस्ट, सुंदर शाळा, स्वच्छ शाळा या आणि यासारख्या अनेक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाचे महत्व त्यांनी कथन केले. अशा अनेक छोट्या छोट्या उपक्रमातून मोठा उपक्रम तयार होतो असे ते म्हणाले. "भिजू आणि मोजू" या उपक्रमातून विद्यार्थी आपल्या परिसरामध्ये किती पाऊस झाला ते मोजतात. अनेक वेगवेगळ्या भागात किती पाऊस झाला? हे समजण्यास विद्यार्थ्यांना मदत होते. आनंद नगरीच्या माध्यमातून विक्रीय कला विकसित होण्यासाठी मदत होते. अशा विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील सर्वांगीण विकास वाढीसाठी आपल्याला मदत होते. असे सांगत गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम हे अत्यंत महत्त्वाचे आहेत असेही त्यांनी सांगितले. उपक्रमातून विविध कौशल्याचा विकास असा होतो हे त्यांनी विविध उदाहरणाद्वारे सांगितले. त्याबरोबरच पर्यावरण संरक्षण, स्वच्छतेचे महत्व आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचण्याचे आवड कशी निर्माण करता येईल याविषयी त्यांनी माहिती दिली. या विविध उपक्रमामध्ये कृती, उद्दिष्टे आणि त्यातून मिळणारी निष्पत्ती हे तीन महत्त्वाचे घटक असतात असे त्यांनी सांगितले. या सत्राचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. संतोष पाटील तांबे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली गोरे यांनी केले, तर नितीन कटारे यांनी आभार मानले. शिबिरास विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. संतोष पाटील तांबे, आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य आर. बी. रामावत, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका एम. के कोळगे, तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दिनांक 26- 5- 2025 ते 5- 6- 2025 असे दहा दिवसाचे सदर शिक्षक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.