संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार होण्यासाठी उत्कृष्ट श्रोते व्हा: डॉ.विठ्ठल जायभाये
सिंदफणा शाळेत लोकनेते सुंदरराव सोळंके व्याख्यानमालेचे तृतीय पुष्प उत्साहात
दखनी स्वराज्य, माजलगाव प्रतिनिधी -
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार होण्यासाठी आधी उत्कृष्ट श्रोता व्हावे, चांगले ऐकावे, असा सल्ला सुप्रसिद्ध कवी व लेखक प्रा. डॉ. विठ्ठल जायभाये यांनी दिला. ते विद्याभुवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिंदफणा पब्लिक स्कूल द्वारा सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री लोकनेते सुंदरराव सोळंके व्याख्यानमालेच्या तृतीय पुष्पामध्ये बोलत होते. यावेळी माजलगाव येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोवर्धन सानप अध्यक्षीय स्थानी उपस्थित होते. सिंदफणा पब्लिक स्कूलचे उपाध्यक्ष वीरेंद्र सोळंके यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमास लाभली.
व्याख्यानमालेची सुरुवात शाळेचे संगीत शिक्षक चैतन्य जाधव, सखाराम जोशी, प्रवीण मडके व ज्ञानेश्वर कुंडकार यांनी गायलेल्या साने गुरुजी रचीत 'बलसागर भारत होवो ' या व्याख्यान गीताने झाली.
व्याख्यानमालेच्या तृतीय पुष्पाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य अन्वर शेख यांनी केले. तसेच पाहुण्यांचा परिचय शाळेच्या पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख अर्चना जाधव यांनी करून दिला. आपल्या अध्यक्षीय भाषणात सुंदरराव सोळंके महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोवर्धन सानप यांनी शालेय स्तरावर व्याख्यानमालेचे आयोजन केल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले. तसेच शालेय स्तरावर अशा प्रकारच्या व्याख्यानमालांची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका ललिता सोळंके यांनी केले. तर सांस्कृतिक विभाग प्रमुख सखाराम जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग,शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.