संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
टाकळी अंबड येथील प्रवाह परिवारात नवीन सदस्याचे आगमन
दखनी स्वराज्य, पैठण प्रतिनिधी - पैठण : अनाथ, निराधार, आदिवासी व परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित असलेले मुला-मुलींसाठी काम करत असलेल्या पैठण तालुक्यातील टाकळी अंबड येथील प्रवाह परिवार या संस्थेने तलवाडा येथील नऊ वर्षाच्या कल्याणीचे पालकत्व स्वीकारले आहे.
साधारणतः चार वर्षांपूर्वी अतिशय सुखी असलेले कुटुंब पुणे येथे वास्तव्यात होतं. कल्याणीचे वडील स्वतः बांधकाम मिस्तरी असल्याने ते कष्ट करून चांगला पैसा कमवत होते. मुलगी शिकली पाहिजे या हेतूने कल्यानीला त्यांनी इंग्लिश स्कूलला देखील टाकले होते. परंतु म्हणतात ना नशिबापुढे कोणाचेही काही चालत नाही. अचानक एके दिवशी कामावर असताना कल्याणीचे वडील हे चौथ्या मजल्यावरून खाली पडले. बऱ्याच ठिकाणी त्यांच्या वरती उपचार केले गेले. परंतु नशीबी आलं ते शेवटी अपयशच…! आणि याच अपयशामध्ये कल्याणीचे वडील हे मागच्या चार वर्षापासून एकाच जागेवरती झोपून आहेत. कल्याणीचे आजी आजोबा पूर्वी कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. परंतु आजोबा आता थकल्याने त्यांना कसलेही काम होत नाही. आणि त्यातच कल्याणीच्या आजीलाही पॅरेलेस झाल्याने त्या सुद्धा एकाच जागेवर पडून आहेत. शेतीचा साधा गुंठाही नाही. अशा संकटाच्या परिस्थितीमध्ये कल्याणीच्या आईने करायचं काय…? खायचं काय…? कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा…? मुलीच्या शिक्षणाचं काय..? दुसऱ्याच्या शेतात रोजाने कामाला जावं तर नवऱ्याकडे आणि सासू-सासरे यांच्याकडे बघणार कोण…? असे अनेक प्रश्न कल्याणीच्या आईसमोर उभे होते. अशावेळी तलवाडा येथील समाजसेवक आर.आर.आबा व गेवराई येथील संघर्ष धान्य बँक यांनी पुढाकार घेऊन सामाजिक मदतीची आव्हान केले. यालाच प्रतिसाद देत अनेक सामाजिक भान जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वाने मदतीचा हात पुढे केले. याच मदतीच्या जोरावर कल्याणीची आई पिठाची गिरणी व शिलाई मशीन चालून कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागली. पण एकट्या बाईला एवढ्या मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून मुलीचे शिक्षण करणे ही गोष्ट मात्र शक्य नव्हती.
म्हणून प्रवाह परिवाराने नऊ वर्षाच्या चिमुकल्या कल्याणीचे पालकत्व स्वीकारले आहे. यापुढे तिच्या शिक्षणासह तिची सर्वस्वी जबाबदारी ही प्रवाह परिवाराने उचलली आहे. कल्याणी सारख्याच अनेक मुला-मुलींचे भवितव्य घडवण्यासाठी प्रवाह परिवार नेहमीच आपल्या सर्वांच्या सहकार्याने कार्यरत राहील. आणि एक दिवस ही मुले सुद्धा आपल्या पायावरती ठामपणे उभा राहून समाजात शक्य होईल तेवढा बदल करतील. आपण देखील आपल्या परीने समाजात शक्य होईल तेवढा बदल करत राहावे असे आवाहन प्रा रामेश्वर गोरडे केले आहे. कल्याणीला प्रवाह परिवारापर्यंत पोहोचविण्यासाठी समाजसेवक सुरेश नवले व समाजसेवक आर. आर. आबा यांनी अथक परिश्रम घेतले.