संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
जानेवारी-२०२५ मध्ये राज्यस्तरीय ‘आविष्कार’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे संपन्न होणार आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांची पूर्वतयारी म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्यावतीने जिल्हास्तरीय महोत्सव घेतला जात आहे. शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमधील संशोधन कल्पकता व नवोपक्रमांना अधिकाधिक चालना मिळावी, ग्रामीण भागातील अधिकाधिक विद्यार्थी सहभागी व्हावेत यासाठी यावर्षीचा आविष्कार प्रथमत: जिल्हास्तरावर घेण्यात येत आहे. दि. ८ ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर व जालना आणि १० ऑक्टोबर रोजी बीड व धाराशीव येथे हे जिल्हास्तरीय महोत्सव होणार आहेत. सहभागासाठी विद्यार्थ्यांना दि.०५ ऑक्टोबरपर्यंत नावनोंदणी करण्याची अंतिम मुदत आहे. मानव्यविद्या, भाषा आणि ललित कला, वाणिज्य, व्यवस्थापन व विधी, विज्ञान, कृषी व पशुसंवर्धन,अभियांत्रिकी व तंत्रज्ञान आणि औषधनिर्माणशास्त्र अशा सहा गटात ज्ञानशाखानिहाय ही स्पर्धा असून पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तरनंतरची पदवी अशा तीन स्तरावर ही स्पर्धा आहे. सहभागासाठी पदवीसाठी २५ , पदव्युत्तर, पदव्युत्तरनंतरची पदवी यासाठी ३० वर्ष वयाची अट असेल.
छत्रपती जिल्हा समन्वयक म्हणून प्रा. दीपक पाचपट्टे, प्रा. प्रवीण यन्नावार प्रा. विष्णू पाटील, प्रा. दिनेश लिंगमपल्ले हे काम पाहणार आहेत. तर विद्यापीठाच्या मुख्य संयोजन समितीत समन्वयक डॉ. भास्कर साठे, प्रा.बी.एन.डोळे,प्रा.प्रवीण यन्नावार, प्रा.शशांक सोनवणे, प्रा.पुरुषोत्तम देशमुख, प्रा.आनंद देशमुख, डॉ. सचिन भुसारी, डॉ.सतीश भालशंकर, डॉ.सुहास पाठक, प्रा.राम कलाणी, डॉ.माधुरी सावंत, डॉ. स्मिता साबळे यांचा समावेश आहे.
कुलगुरू डॉ.विजय फुलारी, प्र-कुलगुरू प्रा.वाल्मिक सरवदे, कुलसचिव प्रा.प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन देवगिरीचे प्राचार्य डॉ.अशोक तेजनकर, विद्यार्थी विकास संचालक डॉ.कैलास अंभुरे व आविष्कारचे समन्वयक डॉ. भास्कर साठे, आयोजक प्रा. विष्णू पाटील, प्रा. दिनेश लिंगमपल्ले यांनी केले आहे.