Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

दिवाळी अंकाने खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जपली - पुण्यातील अक्षरधारा येथे उत्तम सदाकाळ यांचे प्रतिपादन

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 11 November 2024 06:35 AM

दिवाळी अंकाने खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जपली

-पुण्यातील अक्षरधारा येथे उत्तम सदाकाळ यांचे प्रतिपादन


(दखनी स्वराज्य, ता.10/ पुणे प्रतिनिधी)

       दिवाळी अंकांचा एक वेगळा वाचक वर्ग आहे. विनोदी, सामाजिक, कौटुंबिक, महिला विशेषांक,रहस्य गुढ, भय, शृंगारिक आणि ज्योतिष असे विविध विषय घेऊन बाजारात दरवर्षी दिवाळी अंक येतात. तर काही दिवाळी अंक विशिष्ट विषय घेऊन येतात. आपली संस्कृती ही खऱ्या अर्थाने दिवाळी अंकांनी जपली आहे. महाराष्ट्राला दिवाळी अंकाची जुनी परंपरा लाभली आहे, असे प्रतिपादन पुण्यात अक्षरधारा बुक गॅलरी येथे प्रसिद्ध साहित्यिक उत्तम सदाकाळ यांनी व्यक्त केले.
              मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या निमित्ताने पुण्यात अक्षरधारा बुक गॅलरी येथे वाचकांची पावले दिवाळी अंक खरेदी करण्यासाठी वळत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने विनोदी अंक, सामाजिक अंक, बाल अंक, भय कथा, रहस्य कथा, गुढ कथा असलेले अंक, शृंगारिक अंक किंवा एखादा विशिष्ट विषय घेऊन दिवाळी अंक बाजारात आले आहेत. ते खरेदी करण्यासाठी वाचकांची झुंबड उडत आहे. यावर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आल्याने मराठी वाचकांची संख्या अधिक वाढली आहे. आपली संस्कृती ही खऱ्या अर्थाने दिवाळी अंकांनी जपली आहे. महाराष्ट्राला दिवाळी अंकाची जुनी परंपरा लाभली आहे, असे मत पुण्यात अक्षरधारा बुक गॅलरी येथे प्रसिद्ध साहित्यिक उत्तम सदाकाळ यांनी व्यक्त केले. यावेळी तेथे पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर उपस्थित होते.
         यावर्षी जत्रा, फिरकी, धमाल धमाका, महाराष्ट्राची जत्रा, अनुरव, संस्कृती,संवाद , व्यासपीठ, खतरनाक, शब्दकुसुम, शुभम, अपेक्षा, धुळपेरनी, कादवा शिवार, मनातली जाणिव, नाथनगरी, अभियंता मित्र, लाडोबा, सुभाषित, कुळवाडी, युवा ध्येय, रंगतदार, धमालनगरी, वार्ता, झुंज, मातृरक्षा, सर्वस्पर्शी, कादवा शिवार, पार्टनर, वर्ल्ड सामना, संयम, प्रसाद, चपराक, नवलकथा आणि भूमिका यांसारखे दिवाळी अंक मराठी वाचकांच्या मनात आपले स्थान टिकवून आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.