संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
(दखनी स्वराज्य, चिंचवड) : मानवी मनाला घडविण्यासाठी संस्कार हा प्रभावी उपाय आहे. आजची मुले उद्याचा समाज आहेत. त्यामुळे उद्याचा सक्षम समाज घडविण्यासाठी आजपासूनच मुलांच्या मनात संस्कार रुजविले पाहिजे. असे मत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या चिंचवड शाखेचे उदघाटन राजगुरू यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, कोषाध्यक्ष संजय ऐलवाड, कार्यकारिणी सदस्य श्रीकांत चौगुले, चिंचवड शाखेचे अध्यक्ष दीपक पागे, प्रियांका नलावडे, शलाका पागे आदी उपस्थित होते.
राजगुरू म्हणाले, "आजचा समाज अत्याचारी का बनला आहे? असा समाज का निर्माण झाला? याचे उत्तर प्रदूषित वातावरणात उत्तम संस्काराचा अभाव असेच आहे. आता मने बोथट झालेल्या मोठ्या माणसांवर संस्कार रुजत नाहीत, मात्र आपल्या हातात असलेल्या नव्या पिढीवर नक्कीच चांगले संस्कार करता येतील. त्यामुळे चांगल्या समाज निर्मितीसाठी मुलांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
हेच काम बालकुमार संस्था करत आहे. मुळात बालकांचा सर्वांगीण विकास करण्याचा वसाच या संस्थेने घेतला आहे. या कामात सर्वांनी सहभागी व्हावे." असेही माधव राजगुरू यांनी सांगितले.
अनिल कुलकर्णी यांनी संस्थेची माहिती दिली. संजय ऐलवाड यांनी मनोगत व्यक्त केले. दीपक पागे यांनी प्रास्ताविक केले. मधुरा पागे व आरोही देशपांडे बालकवयित्रींनी स्वरचित कविता सादर केल्या. प्रज्ञा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले, मंगेश उंबराणी यांनी आभार मानले.