संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पैठण- पैठण येथील विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये "शिक्षक प्रशिक्षण शिबिर 2025" आयोजित केलेले असून 3 जून रोजी आठव्या दिवसाच्या सत्रांमध्ये "शिक्षक पालक आणि बालमानसशास्त्र" या विषयावर बोलताना सौ. पल्लवी सोळंके म्हणाल्या, इतर क्षेत्रापेक्षा शिक्षण क्षेत्र वेगळे आहे. कंपनीतील लोकांचा संबंध निर्जीव वस्तूशी असतो आणि आपण ज्या क्षेत्रात काम करतो ते सजीवांचे क्षेत्र आहे. तुमच्यावर 100% विश्वास असणारे विद्यार्थी तुमच्या समोर असतात. त्यांच्यामध्ये नवीन उत्साह असतो. विद्यार्थ्यांच्या बाबतीत नेहमी सकारात्मक बोला. 'घोका आणि ठोका' ही वेळ आता राहिली नाही. शिक्षकाची समाजात वेगळी प्रतिष्ठा आहे. शिक्षकांनी नम्रपणा, आत्मविश्वास, स्वीकारहार्यता हे गुण अवगत करणे गरजेचे आहे. तेच गुण विद्यार्थ्यांमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. कोणतेही मूल वाईट नाही, त्याला ओळखण्यास शिका, त्यामधील गुणांना ओळखा व पालकांशी चर्चा करून त्या गुणांना वाव मिळवून देण्याचा प्रयत्न करा." पुढे बोलताना म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घ्या, हे विविध उदाहरणे देत समजून सांगितले. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करताना सराव महत्त्वाचा आहे. सरावाशिवाय उद्दिष्ट पूर्ण होणार नाही. सराव होत नाही तोपर्यंत उपयोग नाही. विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव द्या. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रवींद्रनाथ टागोर, छत्रपती शिवाजी महाराज इत्यादींचे उदाहरणे देत मुलातील सुप्त गुणांना वाव द्या. त्यांच्यातील सुप्त गुणांना बाहेर काढा, ते काम शिक्षकाचे आहे, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. विद्यार्थ्यांची एकमेकांशी तुलना न करता सहज समजून सांगा. तुला का शिकायचे आहे? त्याच्यातील का स्पष्ट करत, त्याला शिक्षणाचे महत्त्व समजून द्या. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी याप्रसंगी दिला. शिबिरास विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. संतोष पाटील तांबे, आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज चे प्राचार्य आर. बी. रामावत, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका एम. के कोळगे, तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा देशमुख यांनी केले. प्रास्ताविक अशा अवधूत यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय प्रियंका गायकवाड यांनी दिला. आभार संदीप तांबे यांनी मानले. दिनांक 26- 5- 2025 ते 5- 6- 2025 असे दहा दिवसाचे सदर शिक्षक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.