संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
विद्यार्थ्यांच्या शिक्षणात आईची भूमिका मोलाची - डॉ. रश्मी बोरीकर
देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयात आई मेळावा संपन्न
(दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी) देवगिरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या महिला पालकांसाठी आई मेळाव्याचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते. या आई मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रश्मी बोरीकर होत्या. त्यांनी ‘आकाशी झेप घे रे पाखरा’ या विषयावर उपस्थित महिला पालकांशी हितगुज साधताना म्हणाल्या की, आजच्या वेगवान युगात येणाऱ्या पिढ्यांची आव्हान समजून घेणे ही काळाची गरज बनली आहे. पाल्यांना संस्कार देण्याची जबाबदारी आईवडील दोघांचीही समान आहे आपल्या बाळाला आकाशी झेप घेण्याची क्षमता निर्माण करत असताना एक दोर जमिनीशी घट्ट असांवा अशी शिकवण आई वडिलांनी द्यावी तसेच मोबाईल पासून आपण व आपल्या पाल्यांना दूर ठेऊन पालकांनी कुटुंबात संवाद ठेवणे आवश्यक आहे. मुलांना समजून घेऊन त्यांच्या समस्या विषयी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. तसेच या काळात काही मुले-मुली घरापासून दूर असतात काही वेळेस त्यांची वाट चुकण्याची शक्यता असते अशा बदलत्या वेळेस आईची भूमिका जबाबदारी निश्चित मोलाची ठरते. या अनुषंगाने मुला-मुलीशी आईचे नाते कसे असावे, मुलं नैराश्यात जाणार नाही याची कशी काळजी घ्यावी.
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. अंजली काळे यांनी विद्यार्थ्यांची मानसिकता, स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी करावी लागणारी जीवघेणी मेहनत, त्यांच्यावर येणारा मानसिक ताणतणाव, आई-वडिलांनी या काळात घ्यावयाची जबाबदारी आणि त्यांनी घ्यावयाची काळजी, विद्यार्थ्यांचे नैराश्य आणि पालकांची भूमिका याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उपप्राचार्य प्रा.नंदकुमार गायकवाड यांनी आईमेळावा या संकल्पनेची पार्श्वभूमी, उद्देश व्यापक आणि दिशादर्शक असल्याचे सांगितले. प्रमुख उपस्थितीत उपप्राचार्य डॉ. अपर्णा तावरे, उपप्राचार्य सुरेश लिपाने, प्रा. विजय नलावडे, पर्यवेक्षक अरुण काटे, ज्ञानेश्वर हिवरे, रवींद्र पाटील, डॉ. बाळासाहेब शिंदे, डॉ. सीमा पाटील, प्रा. वंदना जाधव यांची होती. सूत्रसंचालन आणि आभार श्रीमती डॉ. मनीषा नाईक यांनी केले.