संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
विजेच्या धक्क्याने परप्रांतीय कामगाराचा मृत्यू
(दै. दखनी स्वराज्य, महेंद्र नरके): हिरडपुरी (ता. पैठण) येथे हॉटेलमध्ये मसाला तयार करताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू झाला.
हॉटेलमध्ये विद्युत उपकरणावर मसाला तयार करीत असताना परप्रांतीय कामगाराचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना (दि. 21) दुपारी घडली. ग्यान कृष्णा तमता (वय 22, ह.मु. हिरडपुरी, ता. पैठण, मूळ राहणार नेपाळ) असे मृत कामगाराचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दुपारी हॉटेलमध्ये ग्यान विद्युत उपकरणावर मसाला तयार करीत होता. यावेळी त्याला विजेचा जोराचा धक्का लागला. त्याला तत्काळ पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याला वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. या घटनेची नोंद विहामांडवा येथील पोलीस चौकीत करण्यात आली आहे. पुढील तपास पाचोडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार किशोर शिंदे करीत आहेत.