संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
युवकांनो कर्तव्यबुद्धीने मतदान करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयात युवकांशी संवाद
(दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर) :- ज्यांची वयाची १८ वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवले नसेल तर तातडीने नोंदवावीत आणि कर्तव्यबुद्धीने आपला मतदानाचा हक्क बजवावा,असे आवाहन आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयातील युवकांशी संवाद साधतांना केले.
कन्नड येथील शिवाजी महाविद्यालयात आज युवा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय भोसले, उपप्राचार्य डॉ.बी.के.मगर, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसिलदार विद्याधर कडवकर आदी यावेळी उपस्थित होते.
मतदार जनजागृतीसाठी महाविद्यालयीन युवकांशी संवाद साधण्यात आला. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, हल्ली आपण केवळ शिक्षण घेत आहोत. त्या शिक्षणाला संवाद आणि संस्काराची जोड देत नाहीत. आपण शिक्षणासोबत सुसंस्कारीत झालो तर आपण संवेदनशील होतो. त्यातून आपल्या बुद्धीचा विकास होऊन खऱ्या अर्थाने आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास होतो. आपल्या राज्याला संतांची मोठी परंपरा आहे. फार चांगले तत्वज्ञान या संतांनी आपल्या वाड.मयात अत्यंत साध्या सोप्या शब्दात सांगितले आहे. त्याचे वाचन, मनन आणि चिंतन करणे आवश्यक आहे. आपल्या आई वडील आणि गुरुजनांचा आदर बाळगणे हे आपले कर्तव्य आहे. तसेच मतदान करणे हे आपले कर्तव्य असून त्याद्वारे आपण लोकशाहीचे संवर्धन करत असतो. त्यामुळे प्रत्येक युवक युवतीने मतदार यादीत आपले नाव नोंदवावे व आपला मतदानाचा हक्क बजवावा,असे आवाहन त्यांनी केले.
महाविद्यालयाच्या पारिजात या वार्षिक अंकाचे प्रकाशनही यावेळी जिल्हाधिकारी स्वामी व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विजय भोसले यांनी तर आभारप्रदर्शन संतोष गोरड यांनी केले.