संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
कथेत निर्जीव वास्तुही सजीव करण्याची ताकत
दखनी स्वराज्य, पुणे : निर्जीव वास्तुही सजीव करण्याची ताकद कथेत असते. लेखक कल्पनाशक्ती, प्रभावी शब्द आणि वातावरण निर्मितीच्या माध्यमातून निर्जीव वास्तुही सजीव करत असतो. निर्जीव वस्तू जेव्हा वाचकांशी सजीव होऊन संवाद साधते, तेव्हा वाचकही संवादी होतो. असे मत बाल साहित्याच्या अभ्यासक प्रा. वैदेही कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे जेष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे कथालेखन कार्यशाळा व स्पर्धेत कुलकर्णी बोलत होत्या. या वेळी अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे विश्वस्त राजेंद्र कुलकर्णी, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, कोषाध्यक्ष संजय ऐलवाड, कार्यकारिणी सदस्या निर्मला सारडा, डॉ. अमृता मराठे, इतिहास अभ्यासक गुरुप्रसाद कानिटकर, पल्लवी इनामदार, वैदेही इनामदार, नरहरी अत्रे, पालक, शिक्षक आणि बाल साहित्यिक उपस्थित होते. ही कार्यशाळा डहाणूकर कॉलनीतील सरस्वती विद्यामंदिरात पार पडली.
प्रा. वैदेही कुलकर्णी, विविध अंगाने पात्रांचा विचार केल्यास कथा अधिक फुलत जाते. कथेत पात्र निवड, कथेचे टप्पे, भावना, वातावरण निर्मिती, शब्द रचना, कल्पनाशक्ती, कथेची सुरुवात आणि कथेचा समारोप आधी गोष्टी महत्वाच्या ठरतात. लेखकांच्या मनात जोपर्यंत कथा घडत नाही तोपर्यंत कथा कागदावर उतरत नाही, असेही प्रा. वैदेही कुलकर्णी यांनी सांगितले.
गुरुप्रसाद कनिटकर म्हणाले, कोणतीही गोष्ट सहज घडत नाही. ती अनुभव आणि निरीक्षणातून प्रथम लेखकांच्या मनात उदयाला येते. नंतर ती लेखणीच्या माध्यमातून शब्द रूपाने कागदावर जन्म घेते. मात्र लेखकाच्या मनात आणि डोक्यात कथा तयार असते. पात्र, ठिकाण आणि कथेचे टप्पेही ठरलेले असतात. इतिहास सांगता येतो. मात्र त्यावर कथा लिहताना मर्यादा येतात कारण तेथे पुरावे द्यावे लागतात. लिखाणाआधी पुरावे तपासावे लागतात. इतिहासात कल्पनेत फार रमता येत नाही. वैदेही इनामदार यांनी प्रास्ताविक केले.
चौकट
निर्माण झाली एका ओळीची कथा
कथालेखन कार्यशाळेत मुलांचे पाच गट करून त्यांना एक ओळीची कथा लिहिण्यास सांगण्यात आले होते. त्यात मुलांनी 'कोणीच कसे आज येत नाही खेळायला', 'माईक म्हणतोय वक्त्याला पुरे बास, घेऊ द्या मला श्वास', ' वृक्ष म्हणाला मानवाला मलाही जगू द्या', ' खडू म्हणाला फळ्याला आपले नाते तुटेना', ' मळके फडके म्हणाले टिका लावा माला मी ही सुंदर दिसेल ना?' अशा एका ओळीच्या कथा मुलांनी लिहून सादर केल्या. त्यास उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात मुलांचे कौतुक केले.