Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

शिक्षकांनी विद्यार्थ्यांत बौद्धिक क्षमता, कौशल्य, सकारात्मकता, दुर्दम्य आशावाद, अस्तित्व भान, वाढविण्याचा प्रयत्न करावा- हरिभाऊ बागडे

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 27 September 2024 12:04 PM

शिक्षकांनी विद्यार्थ्यांत बौद्धिक क्षमता, कौशल्य, सकारात्मकता, दुर्दम्य आशावाद, अस्तित्व भान, वाढविण्याचा प्रयत्न करावा- हरिभाऊ बागडे


दखनी स्वराज्य, फुलंब्री -

दिनांक २८ जुलै २०२४ रोजीच्या पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, छ. संभाजीनगर येथील अधिव्याखता, मा. श्री रवी कोरडे यांची उपस्थिती लाभली. अध्यक्षस्थानी पी. ई. एस. मॉडर्न इंजिनिअर महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रोफेसर डॉ. सौ. सुहासिनी नाईक ईटकर उपस्थित राहिल्या.

'मानवी जीवनातील साहित्याचे स्थान' या विषयावर श्री रवी कोरडे म्हणाले की, शिक्षकलेली माणसंच मोठी असतात असं नाही, तर जेव्हा जेव्हा माणसाला बोलावं वाटतं त्यावेळेसच खऱ्या अर्थाने साहित्याची निर्मिती होत असते. त्यामुळे साहित्याचा संबंध लेखन वाचनाशीच असतो असे समजू नये. तर तो माणसाशी आहे. माणसांमध्ये संवेदना निर्माण करणे, माणसाचं जगणं निर्धारित करणं, एकाच आयुष्यात कितीतरी आयुष्य जगता येणं या संबंध बाबींशी साहित्याचा संबंध येत असतो. तसेच साहित्यात काळाच्या सीमा तोडण्याची ताकत आहे. यासोबतच जगण्यातील सकारात्मकता, दुर्दम्य आशावाद व स्वतःच्या अस्तित्वाचं भान देणे. हे साहित्याचे काम आहे. माणसं ही प्रत्यक्षापेक्षा प्रतिमेच्या शोधात असतात. असे मत व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोप डॉ. सुहासिनी नाईक ईटकर यांनी केला. त्यांनी मूल्यधिष्टीत शिक्षणाची आज गरज भासत आहे. त्याचाही आपण सर्वांनी विचार करावा. ही अपेक्षा व्यक्त केली. उपस्थित मान्यवरांचे आभार श्री ताकदुणे यांनी मानले. सूत्रसंचालन श्री कैलास कुबेर यांनी केले. या सत्राची जबाबदारी श्री जुन्नेश्वर विद्यालय, वरुड यांनी यशस्वीपणे पार पाडली.

सहविचार सभेच्या समारोप सत्रात प्रमुख वक्ते म्हणून छ. संभाजीनगर येथील उच्च न्यायालयातील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ मा. अडव्होकेट, श्री संजीव देशपांडे यांची उपस्थिती होती. तर प्रस्तुत सत्राच्या अध्यक्षस्थानी पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. हरिभाऊ बागडे (नाना) उपस्थित होते.

बोलत असताना श्री संजीव देशपांडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या संविधानासाठी परिश्रम घेतले त्या संविधानासाठी नागरिकांनी सर्वप्रथम संविधान साक्षर बनणे आवश्यक आहे. त्यासाठी संविधानाचा अभ्यास करावा. कारण निरक्षर लोकांमुळेच संविधानाला धोका आहे. हे समजून घ्यावे. कारण भारतीय संविधान हा एक राष्ट्रग्रंथ आहे. या संविधानाने सामाजिक समरसता निर्माण करण्याचे काम केले आहे. बंधुता निर्माण केली आहे. यामुळे लोकशाहीवादी राष्ट्र निर्माण होईल. आपणाला समानता आणावी लागेल. राष्ट्राला मजबूत करायचे असेल तर संविधानाला समजून घ्यावे लागेल. राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांसोबत कर्तव्याचीही जाणीव होताना दिसते. हीच कर्तव्य व मूलभूत अधिकार याची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. त्यांच्यामध्ये राष्ट्रगीताबाद्दल आदर कसा निर्माण होईल याच्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे भारतीय संविधानाचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त करावा.

अध्यक्षीय समारोप करत असताना मा. नाना म्हणाले की, संविधानाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व घटना सांगितल्या पाहिजेत. संस्कृती संवर्धन या संदर्भाने चर्चा केली. तसेच विध्यार्थ्यांची बौद्धीक क्षमता वाढीस कशी लावता येईल याचा प्रयत्न शिक्षकांनी करावा. याहीपुढे विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणते गुण असावेत याबद्द्लही छान अशी माहिती दिली.

या सत्रात संस्थेतील निवृत्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा नानांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच गटचर्चेचे वृत्त निवेदन करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष, देवजीभाई पटेल, सचिव, निवृत्ती गावंडे, संचालक, श्री दिनू काका गावंडे, श्री सर्जेराव ठोंबरे, श्री दामू्अण्णा नवपुते, महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. एस. आर. टकले, श्री नारायण बाभुळगाकर, फुलंब्री नगरपंचायतचे नगराध्यक्ष, श्री सुहासभाऊ सिरसाट यांची उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांचे आभार प्रा. डॉ. सुरेश मुंढे यांनी मानले. यावेळी संस्थेच्या संस्कार केंद्रातील सर्व मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या समारोप सत्राची जबाबदारी श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालयाने यशस्वीपणे पार पाडली.