Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

'कला माणसाच्या जगण्याला सत्कारणी लावते'- पद्मश्री सतीश आळेकर

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 17 December 2024 09:06 AM

'कला माणसाच्या जगण्याला सत्कारणी लावते'- पद्मश्री सतीश आळेकर


(दैनिक दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधि) : 

देवगिरी महाविद्यालय व महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेच्या वतीने आयोजित पुरुषोत्तम करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ नाटककार पद्मश्री सतीश आळेकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते देवगिरी महाविद्यालयात बोलत होते. सतीश आळेकर म्हणाले की, नाटक हा कलेचा भाग आहे सध्याच्या काळात चांगली कला कोणती आणि जास्त चांगली कला कोणती. याविषयी सातत्याने चर्चा होते. आजवर कलेच्या प्रांतात नाटक हे मूलभूत आहे. नाटककार एकेक क्षण ते जगत असते. नाटकात एक जिवंत नट व जिवंत प्रेक्षक लागतो. त्यांच्यात एक अदृश्य रेष लागते. जी या दोघांना विभक्त करते. प्रेक्षक नाटक एकादाच बघतो परंतु ते त्याच्या मनावर राज्य करीत असते. नाटकाने प्रेक्षकाच्या  मनात स्मृती विरुद्ध स्मृती हे घडत असते. त्यातून तो नाटकाचे वारंवार प्रयोग पाहायला जातो. कारण जोपर्यंत मानव आहे व  त्याला जगायाचे आहे. त्यासाठी कला महत्वपूर्ण आहे. मानवाचे जगणे सुखद करण्यासाठी कला महत्वाची आहे. ही कला विद्यार्थी जीवनात आत्मसात करण्यासाठी अशा एकांकिका स्पर्धा उपयुक्त असतात.या स्पर्धा विद्यार्थांना स्वतःचा शोध घ्यायला   लावतात.के.नारायण काळे यांनी  महाराष्ट्रीय कलोपासक  त्यासाठीच स्थापन केली होती. पु.ल.देशपांडे याच संस्थेत नाटके करीत होते. 'अंमलदार'  हे नाटक तिथेच घडले. स्वातंत्र्योत्तर काळात ही संस्था महत्वाची भूमिका घेवून काम करीत होती. जब्बार पटेल सारखी माणसं या संस्थेतून पुढे आली. १९६४ साली श.नां.नवरे यांची 'जनावर' ही एकांकिका या स्पर्धेत पहिली आली होती याची आठवण त्यांनी सांगितली. पुरुषोत्तम करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतून अनेक नावीन्यपूर्ण एकांकिका सादर झाल्या आहेत. नव्या पिढीची कलेची भूक भागविण्याचे महत्वपूर्ण कार्य ही स्पर्धा करते. विद्यार्थ्यानो नाटकाकडे गांभीर्याने पहा असा सल्लाही त्यांनी दिला प्रमुख उपस्थितीत असणारे
डॉ. जयंत शेवतेकर म्हणाले,'मराठवाडा ही कलावंताची भूमी आहे.अनेक महाविद्यालयात नाट्यशास्त्र विषय विभाग म्हणून चालतो.पुरुषोत्तम करंडकच्या माध्यमातून नवीन कलावंत तयार होत आहेत. या स्पर्धेचे विजेतेपद मराठवाड्यातील संघाकडेच येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सतीश आळेकरांच्या रंग संस्कारांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी कलावंत घडले आहेत. असे गौरवोउद्गार त्यांनी काढले. 
या समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर म्हणाले, सतीश आळेकर यांच्यासारखे श्रेष्ठ नाटककार महाविद्यालयात येणे ही गोष्ट विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण आहे. कला हीच व्यक्त होण्याचे साधन असते. लेखक, कलावंत दैनंदिन जीवनात आलेले अनुभव कलेच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने व्यक्त करीत असतात. फक्त अनुभव पारखण्याची दृष्टी लागते. सध्या रिल्सचा काळ आहे. मात्र तासभर रिल्स पाहिल्यावर देखील हाती काही लागत नाही पण साहित्य वाचले तर जीवानाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होतो. म्हणून नाटकाला वाहिलेले ही स्पर्धा महत्वपूर्ण आहे. या स्पर्धाच्या माध्यमातून विद्यार्थी घडतो. अशा स्पर्धा आयोजित करण्यात मशिप्र मंडळ व देवगिरी महाविद्यालय पुढाकार घेते. पुरुषोत्तम करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेतून नवे कलावंत घडतील त्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
राजेंद्र नागरे यांनी कलोपासक संस्थाची भूमिका स्पष्ट करून ही स्पर्धा सुरु करण्यासाठीचे राजाभाऊ नातूंचे योगदान व त्यांचे जन्मशताब्दी वर्षाचे हे औचित्य स्पष्ट करून या स्पर्धेचे वेगळेपण विशद केले. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या देवगिरी महाविद्यालयाने आयोजनाची जबाबदारी स्वीकारून या विभागातील कलावंत विद्यार्थ्यांना मोठी संधी उपलब्ध करुन दिली आहे, असे ते म्हणाले. 
या प्रसंगी 'महानिर्वाण प्रयोगलक्षी अभ्यास' या डॉ.नीरज बोरसे यांच्या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मंचावर उपप्राचार्य डॉ. अपर्णा तावरे, डॉ. रवी पाटील, डॉ. विष्णू पाटील हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय प्रा. नीरज बोरसे यांनी आभार प्रा.राम झिंझुर्डे तर सूत्रसंचालन प्रा. शैलजा कुलकर्णी यांनी केले.