Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

मसापच्या शाखेचे शिरूर अनंतपाळ येथे शानदार उद्घाटन

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 27 September 2024 12:04 PM

राजकीय क्रांती करणारी मसाप ही जगातील एकमेव साहित्य संस्था- प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील


मसापच्या शाखेचे शिरूर अनंतपाळ येथे शानदार उद्घाटन



दखनी स्वराज्य, लातूर /अजय गुडसूरकर



"निजामी राजवटीकडून होणाऱ्या भाषिक गळचेपीच्या विरोधात लढा देणाऱ्या मराठवाडा साहित्य परिषदेने राजकीय क्रांतीचे कार्य त्याकाळी केले, या अंगाने कार्य करणारी मसाप ही जगाच्या पाठीवरील एकमेव साहित्य संस्था आहे" असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केले. शिरूर अनंतपाळ येथील मसापच्या नूतन शाखेच्या उद्घाटन प्राचार्य ठाले पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रभाकरराव कुलकर्णी होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय कार्यकारिणीचे उपाध्यक्ष प्रा. किरण सगर, कार्यवाह दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, सदस्य रामचंद्र तिरुके, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर उपस्थित होते.



अनंत अचवले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. "त्याकाळच्या परिस्थितीचा विचार करून भाषिक गळचेपीच्या नावाखाली मराठवाडा साहित्य परिषदेने समाजाचे प्रश्न मांडून राजकीय क्रांतीला बळ दिले, त्यावेळी लढणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांपैकी अनेकजण साहित्य परिषदेचे सदस्य होते असे सांगून प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी मुक्तिसंग्रामातील साहित्य परिषदेच्या योगदानाला उद्धृत केले. साहित्य माणसाच्या जगण्यातून येते मग साहित्याने माणसाचे प्रश्न मांडायलाच हवेत अशी आग्रही भूमिका ठाले पाटील यांनी यावेळी बोलताना घेतली. स्वातंत्र्योतर काळातही परिषदेने समाजाचे प्रश्न संमेलनाच्या व्यासपिठावर मांडून सरकारला ठणकावण्याचे कार्य मसापने केल्याचे प्राचार्य ठाले पाटील पुढे बोलताना म्हणाले. भाषेची ज्योत प्रज्वलित ठेवण्यासाठी साहित्य संस्थानी सक्रिय असायला हवे असे ठाले पाटील पुढे बोलताना म्हणाले. साहित्य संस्था या सरकारी न राहता त्या स्वतंत्र असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असल्याचे निरीक्षण ठाले यांनी नोंदविले.


यावेळी बोलताना जि. प. चे माजी उपाध्यक्ष व मसापच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य रामचंद्र तिरुके यांनी मसापच्या माध्यमातून करता आलेले कार्य हे समाधान देणारे असल्याचे सांगितले. शिरूर अनंतपाळची सांस्कृतिक परंपरा व वाड्मयीन भूक मोठी असल्याचे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोपात प्रभाकरराव कुलकर्णी यांनी सर्व स्तरावर होणाऱ्या मराठी भाषेच्या गळचेपीबाबत चिंता व्यक्त करुन भाषेच्या प्रती असणारी उदासिनता ही घातक असल्याचे सांगितले किरण कोरे व प्रा. कुमार बंडे यांनी सुत्रसंचालन तर देवदत्त मुंढे यांनी आभार मानले.




इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा वाढता प्रभाव पाहता पुढील पिढ्यांना मराठी वाचता येईल का नाही ? अशी आज परिस्थिती आहे. वाचकच नसेल तर मग लेखक कोणासाठी लिहिणार हा प्रश्न असून त्यासाठी मराठी वाचनाचा उपक्रम सामाजिक पातळीवर सुरु करावा लागेल. यासाठी साहित्य संस्था, लेखकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन ठाले पाटील यांनी यावेळी केले.

स्वातंत्र्यपूर्व काळात भाषिक जागृतीसाठी मसापने हे कार्य केल्याचे ठाले पाटील यांनी आवर्जून सांगितले.