Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

मी कवितेला आई मानतो - कवी आबा पाटील

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 27 September 2024 12:04 PM

मी कवितेला आई मानतो - कवी आबा पाटील


आबा पाटील यांची प्रत्येक कविता काळजापर्यंत पोहोचते - डॉ. ललिता गादगे


माझे लेखन माझी भूमिका मध्ये 'घामाची ओल धरून' काव्यसंग्रहावर चर्चा


दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर

: प्रगतिशील लेखक संघाच्या 'माझे लेखन माझी भूमिका' या लोकप्रिय ठरलेल्या सदराचे आयोजन विवेकानंद महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या चर्चेत कर्नाटकातील मंगसुळी येथील शेतकरी कवी आबासाहेब पाटील यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या 'घामाची ओल धरून' या बहुचर्चित काव्यसंग्रहाच्या निमित्ताने आयोजित संवाद कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय डुंबरे यांनी केले. आबासाहेब पाटील यांचा परिचय सुनील उबाळे यांनी करून दिला. काव्यसंग्रहावर भाष्य करताना डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी 'कवी हा जन्मावा लागतो. सौंदर्य, कारुण्य ज्या कवितेत असते; तेव्हाच ती कविता अर्थपूर्ण बनते. कवितेचे मूळ शोधण्याचा प्रयत्न आबासाहेब पाटील यांच्या कवितेतून होताना दिसतो. कवी मातीशी इमान राखणारा आहे, तो धार्मिक आहे पण अंधभक्त नाही. शेती करणारे ते आधुनिक वारकरी आहेत. तत्वाशी तडजोड न करणारा हा कवी आहे' असे सांगितले.

आबासाहेब पाटील यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, 'अवघड परिस्थितीला तोंड देत मी कविता लिहिल्या'. यावेळी त्यांनी आपली बेकारीचा प्रखर प्रवास सांगणारी 'अनुभव' ही कविता सादर केली. 'कवितेचा रसिक मोठा असावा लागतो तेव्हा कवी मोठा होतो. कवी म्हणून मला जे काही वाटतं ते मी कवितेच्या पदरात टाकतो. मी कवितेला आई मानतो. कवितेने मला जगण्याचा आधार दिला. मला कवितेने ओळख दिली' असे मत कवी आबा पाटील यांनी मांडले. त्यांच्या मोनालिसा या कवितेसह प्रत्येक कवितेने श्रोत्यांना खिळवून ठेवले.

'युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।

काय केला बाबा। पराक्रम।।

या अभंगाने कवी आबा पाटील यांच्या उपरोधिक शैलीचा परिचय दिला.

अध्यक्षीय समारोपात ज्येष्ठ लेखिका डॉ. ललिता गादगे यांनी आबा पाटील यांच्या कवितेतील कारुण्य, दुःख आणि वास्तविकता कशा पद्धतीने भिडते आणि स्तिमित करते हे सांगितले. 'कुठल्याही प्रकारे प्रतिमा किंवा प्रतीकांचा सोस नसलेली ही कविता आहे. ज्या थोड्याफार प्रतिमा कवितेत येतात त्या आशयात विरघळून जातात. कुठलीही कविता अगदी थेट काळजात जाऊन पोहोचते; हे या कवीचे आणि या काव्यसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे' असे त्या म्हणाल्या.

सूत्रसंचालन प्रगतिशील लेखक संघाच्या राज्य सहसचिव आशा डांगे यांनी केले तर प्रा. विवेक घोलप यांनी आभार मानले. याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉ. ऋषिकेश कांबळे, कुंडलिकबापू अतकरे, प्रगतिशील लेखक संघाचे राज्य कार्यवाह डॉ. सुधाकर शेंडगे, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य डॉ. समाधान इंगळे, डॉ. अनिरुद्ध मोरे, डॉ. सुभाष बागल, शाहू पाटोळे, प्रिया धरुरकर, शमा बर्डे, माधुरी चौधरी, सुदाम मगर, राजेश मुंडे, महेश अचिंतलवार, रुपाली पाटील, अभय टाकसाळ, डॉ. संजय वाघ, प्रा. ज्ञानेश्वर कुलकर्णी, ॲड. योगेश अक्कर, चक्रधर डाके, हबीब भंडारे, अंकुश सोनवणे यांच्यासह साहित्य क्षेत्रातील मान्यवर, मराठी भाषा संशोधन केंद्राचे संशोधक विद्यार्थी आणि श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.