संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
जुन्या आठवणी लिहिताना सातत्य, उत्स्फूर्तता आणि निरागसता असल्यास संबंधित लेखन वाचकाला निश्चितच भावते. पण, त्यात कृत्रिमता आणि रुक्षपणा असल्यास भावत नाही. असहिष्णू आणि विषारी वातावरणाचा स्पर्श टाळून संतोष आळंजकर यांनी ‘रानभुलीचे दिवस’ या पुस्तकात गतकातरता मांडूनही ते प्रेरक आणि ग्रामजीवनाचा इतिहास ठरले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक जयदेव डोळे यांनी केले.
ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे यांच्या ‘शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान’चा २३ वा ‘शेतकरी साहित्य पुरस्कार’ संतोष आळंजकर यांना ‘रानभुलीचे दिवस’ या ललित गद्यसंग्रहासाठी आणि ‘संदीप दळवी बालसाहित्य पुरस्कार’ गणेश घुले यांना ‘सुंदर माझी शाळा’ या बालकवितासंग्रहासाठी प्रदान करण्यात आला. रोख पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या नांदापूरकर सभागृहात रविवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक जयदेव डोळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. वासुदेव मुलाटे, प्रतिष्ठानच्या प्रेरणा दळवी आणि नीळकंठ डाके यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘मागील दहा वर्षांत शिक्षणाची दूरवस्था झाली आहे. सर्वत्र शाळेच्या पिवळ्या रंगाच्या बस दिसतात. पण, खेड्यात शिक्षणाची अवस्था चिंताजनक आहे. या परिस्थितीत गणेश घुले यांचा ‘सुंदर माझी शाळा’ हा कवितासंग्रह काही मर्यादांसह उत्तम कविता संदेश देणारा आहे. ‘ढ’ मुलांवरील कवितेतून त्या मुलांची मनोवस्था मांडली आहे. मात्र, सचित्र कवितांच्या पुस्तकातील चित्रांतून पुरुषसत्ताक व्यवस्थेचे प्रतिबिंब दिसते’, असे डोळे म्हणाले.
‘रानभुलीचे दिवस’ पुस्तकावर रवी कोरडे यांनी भाष्य केले. ललित लेखनाची मराठी आणि हिंदी साहित्यात मोठी परंपरा आहे. हा साहित्य प्रकार परिघावरचा आहे. कविता, कथा, कादंबरी अत्यंत सर्जनशील प्रकार मानला जातो. पण, जे कवितेतून व्यक्त करता येत नाही त्या भावावस्थेतून होणारे लेखन ललित गद्य असते. ‘रानभुलीचे दिवस’ पुस्तक आळंजकर यांचे बालपणीचे आत्मचरित्रच आहे. अनुभवनिष्ठता असल्याने त्यात कृतकता नाही, असे कोरडे म्हणाले. ‘सुंदर माझी शाळा’वर डॉ. जिजा शिंदे यांनी विचार मांडले. हा कवितासंग्रह शाळेच्या सुंदर आठवणी आहेत. मुलांची मनोवस्था लक्षात घेऊन लेखन करणे कठीण असते. शिक्षण व्यवस्थेचे संक्रमण, हरवत चाललेली नैतिकता या परिस्थितीत गणेश घुले यांनी कवितेतून मुलांची मनोवस्था मांडली आहे, असे शिंदे म्हणाले. डॉ. गणेश मोहिते यांनी प्रास्ताविक केले. प्रा. वीणा माळी यांनी सूत्रसंचालन केले आणि प्रेरणा दळवी यांनी आभार मानले.