संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
संत चोखामेळा यांचे विचार समाज व्यवस्थेसाठी प्रेरणादायी -प्र - कुलगुरू डॉ. पराग काळकर............................
पुणे - येथील संत चोखामेळा अभ्यासन केंद्राचा सहावा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे विविध उपक्रम राबविले जातात. त्यानिमित्ताने दुसरे संत चोखामेळा साहित्य संमेलन पैठण येथे होणाऱ्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल संत साहित्याचे अभ्यासक आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे विद्यमान अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे यांचा सत्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संत चोखामेळा यांचे अभंग लिहिलेली शाल, श्रीफळ, आणि पुष्पगुच्छ असे सन्मानाचे स्वरूप होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
संत चोखामेळा यांचे वंशज राम सर्वगोड यांसह डॉ. ओम श्रीदत्तोपासक, प्रा. विनोद सूर्यवंशी हे मान्यवर उपस्थित होते.
समारंभाच्या प्रारंभी संत चोखामेळा यांच्या प्रतिमेला प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रा. अलका सपकाळ, निवेदक रानकवी जगदीप वनशिव, ॲड. क्षितीज खरात, चंद्रकांत जोगदंड, शिक्षक विद्यार्थी विविध क्षेत्रातील आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.देवीदास बिनवडे यांनी केले. त्यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. प्रामुख्याने गरजू, गरीब मुलांना पुस्तके, महिलांना शिलाई मशीन, सायकल वाटप, समतावारी, पुस्तक प्रकाशन इत्यादी उपक्रम राबवले जात असल्याचे सांगितले. संत चोखामेळा यांच्या जीवन प्रसंगांवर आधारित संपादित ग्रंथाचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे संपन्न झाल्याचेही ते म्हणाले.
प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संत साहित्याने समाजाला अनुभवाचे धडे दिले असून प्रत्येकाने जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पहावे असे आवाहन केले. संत साहित्य हाच एक उपाय आहे. आपली दृष्टी बदलली पाहिजे. मराठी भाषेचा दर्जा आपण जपलाच पाहिजे असे आग्रही प्रतिपादन देखील डॉ. काळकर यांनी याप्रसंगी केले. प्रा. डॉ. संदीप सांगळे यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद हे संत चोखामेळाचे आशीर्वाद समजावे. चांगल्या विचारांच्या निर्मितीचा
प्रसार आणि समाजमनाला विचार देण्याच काम संतानी केले. संत विचार पुढे नेण्यासाठी जे जागर करतात त्यांचे कार्य उत्तरोत्तर पुढे नेण्याचे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. आपण सगळेच पालखीचे भोई आहोत. या काळातील नवी पिढी संतांचा वारसा पुढे नेणारी आहे. ज्ञान मंचावरील सर्वच मान्यवर संतांचा विचार आपल्या कृती, उक्तीतून पुढे घेऊन जातील असा आशावादही डॉ. पराग कळकर यांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना विठ्ठलपुत्र आणि नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. संदीप सांगळे म्हणाले, माझ्या साहित्य कार्याला संमेलनाध्यक्षपदाचा बहुमान दिला त्याबद्दल मी संस्थेच्या ऋणात राहू इच्छितो. साहित्य आणि समाज एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. समाजातील बारकाव्यांचे तटस्थपणे निरीक्षण करून आपण लेखणी द्वारे निर्मिती केली तर कविता, लेख, नाटक, कथा कादंबरी जन्म घेते. समाजाची नाडी लेखकाला ओळखता यायला हवी. मग उत्तम व वास्तववादी कलाकृती घडते. साहित्यातील विविध प्रवाह समाज उपयोगीच असतात. संत साहित्य देखील त्यास अपवाद असू शकत नसल्याचे डॉ. सांगळे म्हणाले. संमेलनाध्यक्ष पदाची मला दिलेली जबाबदारी यशस्वी करण्याचा निश्चित प्रयत्न करेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. ज्या विद्यापीठाने मला आयुष्याची शिदोरी दिली अशा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रतिष्ठा, लौकिक जपणारे प्र- कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या शुभहस्ते माझा सत्कार केला त्यामुळे मी धन्य झाल्याचा भावही डॉ. संदीप सांगळे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भारत सासणे म्हणाले, दूषित वातावरणाला निर्मळ करण्यासाठी साहित्य संमेलन असते. साहित्यातून प्रेमाचा, मानवतेचा आणि एकात्मतेचा संदेश देता येतो. साहित्य निर्मिती करताना मनाची कवाडे उघडली पाहिजेत . नियोजित संमेलन आयोजकांचे श्री. सासणे यांनी यावेळी कौतुक
केले.
आभारप्रदर्शन डॉ. जयवंत अवघडे यांनी केले.
ह.भ.प. प्रसाद महाराज माटे यांनी ओघावत्या शैलीत बहारदार दमदार आवाजात सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली पुणे येथील गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स यातील सावरकर सभागृहात वर्धापनदिन सत्कार सोहळा संपन्न झाला.