Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

तिफण कविता महोत्सव : काव्यप्रेमींसाठी एक पर्वणी

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 18 December 2024 07:38 AM

तिफण कविता महोत्सव : काव्यप्रेमींसाठी  एक  पर्वणी         

(दैनिक दखनी स्वराज्य, कन्नड)

  प्रत्येकाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा , कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या , निमित्ताने अथवा रूपाने " पर्वणी "  ही कधीतरी चालून येतेच. आयुष्यात आलेल्या संधीच सोनं न करेल तो माणूस कुठला?  मला  तर वाटतं  सोन्याला महत्त्व द्यावं का की लोखंडाला महत्त्व द्यावं ? नाही नाही सोनं निव्वळ तिजोरीत पडून राहतं किंवा अंगावर जरी घातलं तरी ते काही काळच ...मग ते काय कामाचं? मग लोखंड व्हावं का? नको नको त्यावर देखील गंज चढतो. मग परीस ? हो हो परिसच व्हावं. कारण जिथे जाईल तिथे लोखंडाच सोन करावं आणि असाच परिसस्पर्श माझ्या जीवनात झाला तो या तिफण कविता महोत्सवाच्या माध्यमातून.  खरं तर खूप मोठी पर्वणी,  आनंदाचा सुकाळ आणि तिथूनच झालेली भरभराट मी अनुभवली आहे . नव्हे तर प्रत्येक नवकवी या मातीतून घडलेत आणि त्यांच्यासाठी हा तिफण काव्य महोत्सव म्हणजे जणू एक पर्वणीच होय. कारण या कविता महोत्सवांमध्येच सर्व कवींनाच नाही तर नवकवींना  देखील हक्काच व्यासपीठ मिळत असतं.  जिथे सहजपणे पोटातलं ओठात येऊन ते सर्वांसमोर सादर केलं जातं.  त्यामुळे मला तरी वाटतं की तिफण कविता महोत्सव म्हणजे काव्यप्रेमींसाठी एक आनंदाची पर्वणीच आहे. 
          माझा स्वानुभवच मी कथन करणार आहे ज्यावेळी  नेहमीप्रमाणे दरवर्षी 7 जानेवारी 2023 रोजी पिशोर  येथे  "राज्यस्तरीय तिफण कविता महोत्सवाचे"  आयोजन करण्यात आले होते आणि व्हाट्सअप ग्रूप वर/ सोशल मीडियावर मी पत्रिका वाचली  आणि सहजच मी या कार्यक्रमास उपस्थित राहिले. खरंतर माझी कुठलीही तयारी नव्हती ; अगदीच काही मोजक्या कविता मी केलेल्या होत्या. परंतु कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की मला पहिल्यांदाच कविता सादर करण्यासाठी एवढ मोठ आणि हक्काच  व्यासपीठ मिळेल आणि इतक्या मोठ्या दिग्गज कवीवर्य  यांना मी इतकं जवळून पाहीन. या तिफण कविता महोत्सवात आल्यापासून मी बरंच काही लिहू लागले, वाचू लागले. जीवनात जणू एक नवीन उमेद ,उमंग, उत्साह हा तिफण काव्य महोत्सव माझ्यासाठी घेऊन आला. अगदी मीच नाही तर अनेक नामवंत कवी येथे येऊन आपली कविता सादर करत असतात. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा म्हणेल की सर्व कविंसाठी  हा तिफण कविता महोत्सव म्हणजे खरोखर एक पर्वणीच होय. याच तिफण कविता महोत्सवात मी माझी पहिली कविता सादर केली आणि मला तिथे "सन्मानपत्र " व " सन्मानचिन्ह "देखील भेट म्हणून दिल गेलं . जे की मी आजही हृदयाच्या एका कोपऱ्यात तर हळुवार जपून ठेवलच परंतु घरातही ते सुरक्षित  जपून ठेवलय. 
         खर सांगायचं म्हटलं तर मी जरी कविता करत असले किंवा लिहीत असले तरी मध्यंतरीच्या काळात मी अगदीच वाचन - लेखन पूर्णतः बंद केलं होतं ; कारण कामाचा वाढता व्याप व हळूहळू छंदही जोपासण मला अवघड होऊ लागलं . मात्र अचानकच "स्वाती"  नक्षत्राचा पाऊस सागरातल्या शिंपल्यात पडावा आणि त्याचा मोती व्हावा तसच माझ्या देखील आयुष्यात तसंच झालं . खरंतर माझ्यासाठी ही पर्वणीच होती.  ज्याप्रमाणे दर बारा वर्षांनी " कुंभमेळा" येतो आणि तोही तिथेच साजरा केला जातो जिथे समुद्रमंथन झाल्याच्या नंतर जो कुंभ सापडला होता आणि त्या कुंभातील काही 'अमृताचे थेंब'  जमिनीवर सांडले होते त्याच ठिकाणी हा कुंभमेळा दर बारा वर्षांनी भरवला जातो तसेच मला तर वाटते की जिथे जिथे हा तिफण कविता महोत्सव साजरा होतो ते स्थळ त्या जागेची महिमा काही औरच असली पाहिजे यात शंका नाही आणि म्हणून मागच्या वर्षी पिशोर आणि यावर्षी देखील मेहगाव येथील संत भगवान गडावर हा " तिफण कविता महोत्सव"  साजरा केला जातोय  या पर्वणीमध्ये आपण सर्वांनी आवर्जून  यावच आणि आपण येणारच असाल.  परंतु खरंच आपल्यासाठी ही सुवर्णसंधीच आहे. या तिफन कविता महोत्सवामध्ये मी अनेक दिग्गज मान्यवर कविवर्य यांना फार जवळून बघितले ,अनुभवले आणि ऐकले सुद्धा . त्यांच्या रसाळ वाणीतून जणू अमृतच पाझरत होते आणि याचाही मला पुरेपूर फायदा हा आता कविता लिहिण्यासाठी झालेला असून लवकरच मीही माझे स्वतःचे एक पुस्तक प्रकाशित करण्याच्या मार्गावर आहे .  म्हणूनच पुन्हा म्हणावसं वाटतं जिथे जावं तिथे सोनं बनवून जावं का नाही तर  परीस होऊन जावं?  जिथे जाव तिथे सोनं व्हावं .. तर असंच आपल्याच गाव मातीशी आपली नाळ जोडलेले प्राध्यापक डॉ. शिवाजी हुसे सर. हे सुद्धा जिथे जाईल तिथे सोनं करतात. मलाही जी प्रेरणा मिळाली ती फक्त त्यांच्याकडूनच. तिफण कविता महोत्सव त्यासाठी लागलेले मार्गदर्शन यामध्ये मला मोलाची जी मदत लाभली ती प्राध्यापक डॉ. शिवाजी हुसे सरांची. त्याचप्रमाणे अनेक भागातून आलेले कवी तसेच ग्रामीण भागातील नवकवींसाठी सुद्धा कविता महोत्सव म्हणजे हक्काचे व्यासपीठ जिथे हे मुक्तपणे शब्दांची उधळण करीत असतात. जणू काही याप्रमाणे -
  चाले तिफण...

या कन्नडच्या भूमीत 
घडविले नवकवी मातीत 
नाव त्यांचं तिफणकार
असे सर्वदूर प्रचलित 

दिली होती त्यांनी 
हाती शब्दांची लेखणी 
चाले जोरात तिफण 
करण्या कवितेची पेरणी 

मागितले भूमिपुत्राने 
एकमेव शब्दांचेच दान 
झाले मग हिरवेगार 
बोडके हे माळरान 

वाट अवघड खडतर 
उभे होते स्पीड ब्रेकर 
मार्ग काट्यांचा तरीही 
केला सर्वांसाठी सुकर 

म्हणूनच चाले जोमात 
तयारी कविता महोत्सवाची 
केले सर्वस्व अर्पण 
शान वाढली भूमीची 

दिमाखात उभी स्वारी 
सज्ज मैफिल नवकवींची 
निघाली झोकात तिफन 
पेरणी करण्या अक्षरांची....


          असा हा तिफण कविता महोत्सव सर्व कविंसाठी एक पर्वणीच म्हणावी लागेल....



               वृषाली सोनवणे 
          शिक्षिका तथा कवयित्री