Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

विरोधकांचे आरोप म्हणजे मतदारांनी नाकारल्यामुळे आलेले वैफल्य - कौतिकराव ठाले पाटील

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 14 October 2024 05:01 PM

विरोधकांचे आरोप म्हणजे मतदारांनी नाकारल्यामुळे आलेले वैफल्य - कौतिकराव ठाले पाटील

(दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर) - (दि. १४ ऑक्टोबर २०२४) म. टाइम्समधील बातमी वाचली. निवडणुकीच्या प्रक्रियेच्या काळात असे आरोप प्रत्यारोप होतच असतात हे मी समजू शकतो. पण शक्यतो प्रत्यारोप करायचे नाही, उत्तर द्यायचे नाही असे मी ठरविले होते. पण आता हे अतिच होते आहे म्हणून अगदी थोडक्यात निवडणुकीतील, संस्थावर्धक पॅनलचा प्रमुख म्हणून मी माझे म्हणणे देत आहे.
काही लोकांना सरकारच्या कृपेने नियुक्त्या करून घेऊन काही सत्तापदे मिळत असतात. पण सगळ्याच ठिकाणी हे शक्य नसते. उदा. सरकारकडून नियुक्त्या करून घेऊन विद्यापीठाच्या अभ्यासमंडळाचे अध्यक्ष होणे वेगळे आणि निवडणूक लढवून मराठवाडा साहित्य परिषद किंवा अन्य दुसऱ्या संस्थेत निवडून येणे वेगळे. निवडणुकीत मतदार हा महत्त्वाचा असतो. मतदारांनी प्रतिसाद नाकारला की, विरोधी पॅनलवर, त्याच्या प्रमुखावर किंवा उमेदवारांवर हमखास असे आरोप केले जातात, घटनाबाह्य मागण्या केल्या जातात. त्यात तथ्य नसते व ते शक्यही नसते हे कळत असूनही आरोप सतत वेगवेगळ्या नावांनी सुरूच असतात. यापाठीमागे मतदारांनी प्रतिसाद न दिल्यामुळे आलेले नैराश्य व वैफल्य फक्त असते हे मला कळते. वस्तुतः ज्या 'विचारधारे'त प्रा. जिगे वावरतात, जी विचारधारा त्यांनी अंगिकारलेली आहे. त्या विचारधारेने, 'परिवर्तन' हा शब्द वापरणे हाच मोठा विनोद आहे. अर्थात याचा विचार त्यांच्या सहकारी उमेदवारांनी करावयाचा आहे. कोणी कोठे असावे हा ज्याचा त्याचा मुद्दा आहे त्यावर मी बोलणार नाही. निवडणुकीतील उमेदवार म्हणून त्यांनी संस्थावर्धक अराजकीय पॅनलविरुद्ध अशी पत्रके काढण्याऐवजी व सनसनाटी बातम्या देण्याऐवजी मतदारांची सहानुभूती व प्रतिसाद मिळविण्याला प्राधान्य द्यावे.

त्यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह मतदारांना भेटण्यासाठी व त्यांची मते मिळविण्यासाठी जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड असा मराठवाडाभर निवडणूक प्रचारासाठी एकत्र दौरा केला हे सर्वज्ञात आहे. त्यात काही चूकही नाही. पण या दौऱ्यात मतदाराचा फारसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन ते व त्यांचे एक दोन सहकारी निराशेपोटी असे निराधार आरोप करीत आहेत याशिवाय त्यांच्या म्हणण्यात कोणतेही तथ्य नाही. एवढेच याबद्दल मला सांगावयाचे आहे. या प्रत्युत्तरानंतर निश्चितच साहित्य परिषदेचे मतदार अधिक जागरूकतेने मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.