संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
खरंतर जीवन नुसतं कन्हत, कुढत आणि रडत जगणं हे तर माझ्या डायरीतच नाही. विधात्याने जो मनुष्य जन्म दिला आहे, त्याचा पुरेपूर लाभ घेऊन आयुष्य निखळ आनंदाने जगायचं असं मी ठरवलंय. जीवनात कितीही चढ-उतार येवोत, मला मात्र सुख घटाघटा पिऊन दुःख चघळत बसण्याची अजिबात सवय नाही. मला पुढे चालायला आवडते, मागे वळून पहाण मला जमत नाही. शिवाय हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे धावण तेही आवडत नाही.
मला आवडतं सर्वांना सोबत घेऊन चालण, सर्वांशी मिळून मिसळून राहण, व्यक्ती कोणतीही आणि कशीही असो माझ पटत म्हणजे पटतच. तेही कुठलाही वाद न घालता. खरंतर मी इथपर्यंत येण्यात ह्यांचा सिंहाचा वाटा आहे. असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो. त्यांच्या पाठीमागे स्त्री खंबीर उभी असते. माझं मात्र उलट आहे माझ्या मागे माझ्या आयुष्याचे साथीदार माझे पतीदेव खंबीर उभे असल्याने इथपर्यंत भरारी मारू शकले.
मुल जेव्हा लहान होते त्यावेळी मी शनिवार, रविवार मुलांसोबत घालवत असे. त्यांना फिरायला नेणं, गार्डनमध्ये घेऊन जाण, म्हणजे उद्या म्हणायला नको की, फक्त नोकरी केली किंवा पैसाच कमावला. शिवाय सुट्ट्यांमध्ये आम्ही सर्व फॅमिली हमखास कुठे ना कुठे दौऱ्यावर असायचो. बरीचशी धार्मिक स्थळ आणि पर्यटन स्थळ आमची पाहून झालीत. मुलांना विविध छंद जोपासन, अभ्यासाव्यतिरिक्त हेच माझं नित्याचं काम. त्यातूनच मुलं घडतात अशीच माझी धारणा. सुट्ट्यांमध्ये हा क्लास; तो क्लास उदा. शिबिर जिम्नॅस्टिक, त्व्यायक्वांदो, स्पोकन इ. क्लासेस मी मुलांना आवर्जून लावत असे. एवढ्यासाठी की पुस्तकी किडा न बनता आजच्या स्पर्धात्मक युगात मुलं टिकली पाहिजेत हाच उद्देश. स्वतःही काही ना काही शिकण्याची आवड. गायनाचा/ भजनाचा क्लास स्पोकनचा क्लास असे नित्याने माझे चालूच राही. चार भिंतीच्या आत जगणं मला मान्य नाही. शिवाय एकट्यानेच किंवा फॅमिली पुरतं मर्यादितही नको. कृतीतून करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केलाय. असंच आयुष्य जगत असताना नातेवाईकांच्या महिन्यातून पंधरा दिवसातून भेटीगाठी व्हाव्यात या उद्देशाने आम्ही भिशी सुरू केली. त्यातही सर्व सासर व माहेरकडचीच मंडळी. किंबहुना सासरकडचीच जास्त. फक्त उद्देश एवढाच की नातं जपणं, एकमेकांच्या गाठीभेटी घेणं. मला अभिमान वाटेल की फक्त स्वार्थापुरतीच नाती जपली नाहीत, तर सर्वांना आजही एका माळेत आदर्श रित्या गोऊन ठेवलंय.
माणसाच्या जीवनात दोन मार्ग असतात. एक चांगला एक वाईट. ज्यावेळी वाईट मार्गावर जातो त्या वेळेला यश मात्र लगेच संपादन होतं. कारण तो मार्ग असतो असत्य आणि लबाडीचा. दुसरा मार्ग असतो चांगला. त्यावर मात्र यश संपादन करायला फार कष्ट लागतात. अनेक काटे त्यावर बोचतात, रुततात, पेरलेले असतात. परंतु सत्य हे प्रकाशमान असल्याने अंतिम विजय हा सत्याचाच होतो. आकाशातून एक तारा निखळून पडावा तसा आम्हाला देखील जीवनात सूर गवसला. आम्ही इतके दिवस मृजळामागे धावत होतो. शोधलं की सापडतं या उक्तीप्रमाणे आम्हाला "तिफण सखी मंच" या स्वरूपात रत्नांची खाण सापडली आहे. हल्ली माणसांची घर मोठी झालीत, पण मन मात्र छोटी झालीत. घराच्या कक्षा रुंदावल्या, मात्र मनाच्या अरुंद झाल्या. जीवनात एक आशेचा किरण गवसला. भिशीच्या माध्यमातून एकत्र येणे, भजन, नृत्य, गायन, खेळ इत्यादी उपक्रम राबविणे हेच आमचे काम. मात्र आमच्यासाठी उर्मिला ताई हुसे यांनी एक सुरेख संकल्पना मांडली. त्या म्हणाल्या की आपण काहीतरी वेगळं स्वरूप आपल्या भिशीला देऊया आणि प्रा.डॉ. शिवाजी हुसे यांनी मयूर पार्क येथील हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला सपत्नीक हजेरी लावली. त्यातच त्यांनी जीवन खूप सुंदर आहे, ते आनंदाने कस जगाव? याचं अनमोल मार्गदर्शन केलं. सर्वजण मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. येथूनच आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळाली. जगण्याची एक नवीन दिशा मिळाली, आयुष्याने नवीन वळण घेतले आणि 28/0 2/24 रोजी मयूर पार्क येथे तिफन सखी मंचची स्थापना झाली. अनेक महिलांनी एकत्र येऊन सर्वांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, तसेच त्यांच्यात असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा हाच या मंचचा उद्देश. त्याच दिवशी तेथे कार्यकारिणी निवडल्या गेली आणि अध्यक्ष म्हणून माझी निवड करण्यात आली. सर्वांना एकेक पद बहाल करून बिनविरोध कार्यकारिणी निवडण्यात आली.
अशाप्रकारे ही सुरेख रंगीत संगीत, आनंदमय जीवनाची वाटचाल तिफण सखी मंचच्या माध्यमातून सुरू झाली. जिथे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले, तिफण घेऊन निघालोय. एका दाण्याचे हजार दाणे करण्यासाठी या ध्येयाने प्रेरित झालेले, प्रा.डॉ.शिवाजी हुसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि ही वाटचाल सुरू झाली, नव्हे नव्हे यशस्वी झाली. आम्ही सरांनी सुचविल्याप्रमाणे दर रविवारी निसर्ग भ्रमंतीचे आयोजन केले. सर्वजण न चुकता रविवारी ट्रेकिंगला येतात. साई टेकडी, हनुमान टेकडी, गणेश टेकडी, हिमायत बाग, भांगसी गड, चौका डोंगर, चेतना हॅप्पी व्हिलेज, पळशी, सुखना नदी, विद्यापीठ लेणी, भीम टेकडी, पाटोदा आदर्श गाव अभ्यास दौरा व भेट, वाळूज आषाढी वारी वाळूज पंढरपूर, स्वामी विवेकानंद गार्डन हडको येथे सहल आदी ठिकाणी ट्रेक संपन्न झाले. त्यानंतर आठ मार्च रोजी सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रात व पत्रकार क्षेत्रामध्ये उत्तम आणि चोख कामगिरी बजावणाऱ्या महिलांना त्यांच्या कार्याची दखल घेऊन तिफन सखी मंच तर्फे पुरस्कार व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. खरंतर सर्व महिला विशेषतः प्रतिभा ताठे, अरुणा घुगे, उर्मिला हुसे, अर्चना ताठे, अनिता ताठे, मीना ताठे, योगेश्वरी मुंढे आणि मी वृषाली सोनवणे आम्ही सावित्रीच्या लेकी लिहू लागलो वाचू लागलो. प्रतिक्रिया देऊ लागलो. हे सर्व शक्य झाले ते तिफणकार आणि तिफन सखी मंच मुळेच...!
त्यानंतर विविध कला गुणदर्शन हा कार्यक्रम आहे बहारदार आणि उत्कृष्टरित्या सादर करण्यात आला. चला पक्षी मित्र होऊ या उपक्रमाच्या माध्यमातून पक्षांना गच्चीवर दाणापाणी ठेवून "जगा आणि जगू द्या "हा संदेश कृतीतून देण्यात आला. एकाहून एक सरस कार्यक्रम आणि उपक्रम आम्ही मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली राबविले. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी त्यांचा देखील सत्कार मंच तर्फे करण्यात आला. आम्हास प्रा. डॉ. हुसे सरांनी एक विषय दिला तो म्हणजे "आई" या विषयावर लेख लिहा. सर्वांनी खरंच अप्रतिम लेख त्यावर लिहिला. एवढेच नाही तर तो पेपर मध्येही फोटोसहित छापून आला. स्वप्नातही न बघितलेल्या गोष्टी मात्र प्रत्यक्षात होऊ लागल्या. फक्त तिफण सखी मंच मुळेच. दररोज सर काही ना काही पोस्ट ग्रुप वर वाचण्यासाठी आणि म्हणूनच सर्वजण अभिप्राय लिहू लागल्या, वाचन करू लागल्या, नवनवीन लेख वाचणे, त्यावर प्रतिक्रिया देणे तेवढच सर्वांना काम.
मी म्हटल्याप्रमाणे जीवन जगत असताना दोन रस्ते असतात. एक चांगला आणि एक वाईट आम्हाला मात्र सरांनी हा उत्तम मार्ग दाखवला आणि अख्खा महाराष्ट्रभर तो पोहोचला. याचा सार श्रेय जात ते फक्त तिफनकारालाच. त्यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले आणि आमच्या सखी लिहू लागल्या, बोलू लागल्या, कविता करू लागल्या. सरांनी आम्हाला अभ्यास दौरा म्हणून पर्यटन स्थळी, धार्मिक स्थळी, शांतीवन, संत भगवान बाबा गड, सर्पराज्ञी प्रकल्प आणि मोहटादेवी येथेही नेले. लोक जीवन कसं जगतात किंवा नोकरी करण, मूलबाळ, एवढाच आयुष्याचा उद्देश नसावा किंवा एवढ्या पुरतच आयुष्य मर्यादित नसावं. ज्या समाजात आपण राहतो, वाढतो त्याच आपण काहीतरी देणं लागतो आणि म्हणूनच आता समाजासाठी काहीतरी करायचं, निसर्ग यासाठी पण हातभार लावायचा असं सरांनी आणि त्यांच्या सोबत आम्हीही ठरवलय.
हाच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गांधेली येथे वृक्षारोपणही करण्यात आले. 'झाडे लावूया झाडे जगवूया' निसर्ग संवर्धन करूया, असा मोलाचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. आता मात्र वेध लागले ते आई महोत्सवाचे. लवकरच नवरात्रात नारी-शक्तीचा सन्मान केला जाईल, असा हा आगळा वेगळा अनुभव उपक्रम राबविण्यात येणार आहे. फक्त दांडिया, मनोरंजन एवढ्या पुरताच हा कार्यक्रम मर्यादित राहणार नसून मातृ सन्मान याचा सुरेख संगम साधला जाईल.
अशाप्रकारे आमची ही तिफन सखी मंचची यशस्वी वाटचाल एके दिवशी कळसुबाई शिखर गाठेल एवढं मात्र नक्की.
- वृषाली सोनवणे
शिक्षिका कवयित्री तथा
अध्यक्ष: तिफन सखी मंच